- प्रा. रमेश सप्रे
फक्त जिवंत राहणं, त्यासाठी नाना प्रकारची भोगसाधनं जमवत राहणं, त्यासाठी अखंड निरुद्देश कर्म करत राहणं ही आजही बहुसंख्य लोकांची जीवनपद्धती आहे. पुनर्जन्म, परलोक, यमयातना यापैकी कशावरच विश्वास न ठेवणारी मंडळी त्याही काळात होती म्हणून तर यम हा विषय मांडतोय.
मनःशांती ही आजच्या मानवाची मुख्य समस्या आहे. मानसिक अशांती, अस्वस्थता ही अनेक शारीरिक, मानसिक विकारांचं मूळ कारण आहे. सर्वप्रथम एक गोष्ट निश्चित समजून घ्यायला हवी की मनःशांती ढळण्याची मुख्य कारणं कोणती आणि त्यावर प्रभावी उपाय कोणते आहेत. उपनिषदातल्या ऋषींना ही वस्तुस्थिती पूर्णपणे समजली होती आपल्या खोल चिंतनातून आणि तत्त्वबोध निर्माण करणार्या वाद-संवादातून. त्यांच्या आश्रमात असलेल्या स्नातकांना (विद्यार्थ्यांना) कोणत्याही विषयाचं शिक्षण देताना मनोजय, मनोलय, मनाची एकाग्रता, श्वासाच्या तालाशी शरीराचा नि शरीराशी संबंधित क्रियांचा नि कृतींचा मेळ घातला की सार्या गोष्टी अतिशय सरळ, सुलभ नि सहज होतात आणि मानसिक आरोग्य सांभाळले जाते. यातूनच मनःस्वास्थ्य, मनःशांती यांचा नित्य अनुभव घेणं सोपं जातं.
आजच्या ताण-तणावग्रस्त परिस्थितीत सार्वत्रिक अनारोग्याची भर पडली आहे. सर्व प्रकारची स्वच्छता नि आरोग्य यांची व्यक्तिगत अन् सामाजिक पातळीवर बर्यापैकी काळजी घेऊनही कोविड-१९ या महामारीचा फैलाव रानातल्या आगीसारखा वाढतोय. मनाचं संतुलन धोक्यात आलंय. मोठ्या प्रमाणावर सर्व वयोगटाची माणसं मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊ लागलीयत. आजारी पडल्यावर किंवा पडलेल्यावर औषधोपचार करणं आवश्यक बनलंय. पण त्याहिपेक्षा मन व्याधिग्रस्त होणार नाही आणि शारीरिक व्याधी झाल्यावरही सकारात्मक रीतीनं नि आत्मविश्वासानं तिला सामोरं जाण्यासाठी ज्या मनःस्थितीची गरज आहे ती निर्माण होण्यासाठी विचार नि आचाराची दिशा बदलली पाहिजे. यासाठी जी निरामय दृष्टी हवी ती मिळवण्यासाठी उपनिषदांचा अभ्यास उपयोगी पडेल.
कठोपनिषद हे यादृष्टीनं अतिशय स्पष्ट नि निश्चित मार्गदर्शन करतं. नचिकेता हा बालक – मुख्य म्हणजे त्याची ज्ञान जिज्ञासा – हा आपला आदर्श बनला पाहिजे. आरंभीच जीवनाला कल्याणकारी, शुभफलदायी आणि जीवनाचा घात करणारी, केवळ इंद्रियांचे चोचले पुरवणारी भोगलोलुप अशा श्रेयस नि प्रेयस विचारांची चर्चा केलीय. यमराजानं नचिकेत्याची परीक्षा घेण्यासाठी, जीवनातील अंतिम ज्ञान मिळवण्यासाठी तो पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याला अनेक भोगवस्तूंचं प्रलोभन दाखवलं. पण नचिकेत्यांनी यमराजानं दाखवलेलं आमिष (लालूच) धुडकावलं. मग यमराज उत्साहानं मनःशांतीचा मार्ग आणखी स्पष्ट करू लागला-
दूरमेते विपरीते विषूची अविद्या या च विद्येति ज्ञाता |
विद्याभीप्सिनं नचिकेतसं मन्ये न त्वा कामा बहवोऽलेग्लुपन्त ॥
अर्थ ः- अविद्या आणि विद्या या नावांनी जाणल्या जाणार्या शक्ती परस्परविरुद्ध असतात. विद्या म्हणजे श्रेयस्कर मार्ग सुचवणारी शक्ती तर अविद्या प्रेयस्कर म्हणजे प्रपंचात, संसारात, देहभोगात गुंतवणारी शक्ती. बहुसंख्य लोकांना प्रपंचातील देहसुखाचं खूप आकर्षण असतं. यातच मनाच्या अतृप्तीचं, अशांतीचं मूळ दडलेलं असतं. भोगांची आसक्ती असलेली व्यक्ती अर्थातच त्यागात दडलेल्या कल्याणाच्या, मुक्तीच्या, आनंदाच्या मार्गाकडे वळतच नाही. त्यामुळे मनःशांतीपासून वंचित होते. नचिकेता याला अपवाद. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याही काळात, हजारो वर्षांपूर्वीच्या काळात लोक भोगवादीच होते. समाजाची एकंदर मानसिकता प्रवृत्तीमार्गाकडे वळणारीच होती. निवृत्तीचं आकर्षण कुणालाच नव्हतं.
माणसाच्या जीवनाची चार आश्रमात केलेली विभागणी ही ऋषींची मानवजातीवर उपकार करणारी दृष्टी होती. ब्रह्मचर्याश्रम- गृहस्थाश्रम सार्वत्रिक होते. पण संसार सांभाळायला मुलं सक्षम झाल्यावर वनाकडे प्रस्थान करणारे वानप्रस्थी किती होते अन् त्याहिपेक्षा विचार करून, विवेकमार्गाचं पालन करून संन्यासाश्रम स्वीकारणारे कितीजण होते?
यमाला म्हणूनच नचिकेताचं कौतुक वाटतं. तो खरंच ज्ञानाचा अभिलाषी आहे. इतक्या लहान वयात त्याला आपल्या पिताश्रींची याचकांना विश्वजित यज्ञानंतर दान देताना होणारी चूक लक्षात आली होती. त्याबद्दल गप्प न बसता त्यानं सर्वांसमोर पित्याला विचारलंसुद्धा. पित्याचं कल्याण व्हावं म्हणूनच त्यानं ‘मला कुणाला देणार?’ हा प्रश्न विचारून सावधही केलं होतं. पण त्या स्वार्थी वाजश्रवानं नचिकेताकडे प्रथम पूर्ण दुर्लक्ष केलं. नंतर नाइलाजानं यमाकडे जाण्याची परवानगी त्याला दिली. यमाकडे आला तरी तो पूर्ण सावध होता. पहिला वर मागितला- ‘मी परत जाईन तेव्हा माझ्यावरचा वडिलांचा राग गेलेला असला पाहिजे आणि त्यांना वाटलेलं दुःख नाहीसं झालेलं असायला हवं.’ या मागण्यातील चातुर्य यमाच्या लक्षात आलं. वडिलांसाठी प्रामाणिकपणे वर मागताना त्यानं स्वतःला जिवंत परत जाण्याचं अभिवचनही यमाकडे मागितलं होतं. याबद्दलही यम प्रसन्न झाला. त्यानं मोेठ्या उत्साहानं नचिकेताशी संवाद सुरू ठेवला….
अविद्यायाम्अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितम् मन्यमानाः |
दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अंधेनैव नीयमाना यथान्धाः ॥
म्हणजे अविद्येत राहूनही आपल्याला बुद्धिमान (स्वयंधीरा) आणि विद्वान मानणारे (पंडित मन्यमानाः) पण प्रत्यक्षात भोगांची इच्छा करणारे ते मूर्ख लोक नाना योनींमध्ये भटकत राहून (दन्द्रम्यमाणाः) पुनःपुन्हा त्याच ठोकरा खात राहतात. अंध माणसाच्या मागे जाणार्या आंधळ्या माणसांसारखी त्यांची अवस्था होते. कोणत्याच मुक्कामाला नीट न पोचता ते नुसते भटकत राहतात आणि त्रास सहन करतात.
उपनिषदांची भाषा काही ठिकाणी दुर्बोध, समजायला अवघड अशी असते. म्हणून अभ्यास करण्यासाठी सार्थ (अर्थासह) असलेले विवरणात्मक (स्पष्टीकरण करणारे) ग्रंथच अभ्यासावेत. उपनिषदातील मंत्रांचा अर्थ समजला तर त्यातील तर्कशुद्ध नि अनुभवसिद्ध मार्गदर्शन आपल्याला आजच्या काळासाठीही खूप उपयोगी पडते. अशा अविद्यापूर्ण लोकांची अवस्था कशी असते याचं मार्मिक दर्शन घडवणारा एक अर्थपूर्ण शीर्षक असलेला लेख वाचनात आला होता. त्याचं नाव होतं ‘कर-मर-कर’. हे कुणाचं आडनाव नव्हतं तर अशा प्रवाहपतित लोकांचं जीवनदर्शन होतं ते. सतत काहीतरी करत राहायचं. स्वस्थ बसायचं नाही. व्याप, उपद्व्याप अखंड करत राहायचे अगदी मरेपर्यंत. अखेरपर्यंत कर्मप्रवृत्ती जागी असल्याने, वासना अतृप्त राहिल्याने पुन्हा जन्म आणि काहीतरी सतत करत राहणं. हे खरे अविद्येचं लक्षण आहे. मुक्तीसाठी प्रयत्न न करता पुन्हा पुन्हा जन्मणं – जगणं नि मरणं या चक्रात गरगरत राहणं एवढंच या मंडळींना माहीत.
फक्त जिवंत राहणं, त्यासाठी नाना प्रकारची भोगसाधनं जमवत राहणं, त्यासाठी अखंड निरुद्देश कर्म करत राहणं ही आजही बहुसंख्य लोकांची जीवनपद्धती आहे. पुनर्जन्म, परलोक, यमयातना यापैकी कशावरच विश्वास न ठेवणारी मंडळी त्याही काळात होती म्हणून तर यम हा विषय मांडतोय. अविद्येचा जनमानसावरील प्रभाव सांगून याच्या विरोधात असलेली विद्या मुक्तिदायी आहे हे नचिकेताला तो पटवून देतोय. ‘सा विद्या या विमुक्तये’ म्हणजे मुक्त करते तीच खरी विद्या. ही सद्विद्या मानवाला कशाकशातून नि कशी मुक्त करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
* अध्यात्मविद्या (किंवा आत्मज्ञान) हीच खरी विद्या आहे. बाकी सार्या विद्या.. अविद्या या सदरातच मोडतात. ही आपल्या ऋषीमुनींची नि त्यांच्या ग्रंथांची मुख्य विचारधारा आहे.
* अनेक प्रसंगी जिज्ञासू शिष्य आत्मानुभवी गुरूंना विचारतात, ‘गुरुदेव, अशी कोणती विद्या आहे जी मिळाली आणि इतर कोणतीही विद्या मिळाली नाही तरी जीवनात काही बिघडत नाही.’ काही वेळा असंही विचारलं जातं, ‘गुरुदेव, अशी कोणती विद्या आहे जी मिळाली नाही पण बाकी सगळ्या विद्या मिळाल्या तरी जीवनात वारंवार अडतं किंवा अडचणी येतात?’
आत्मज्ञानी गुरुदेव आत्मविश्वासानं या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एका शब्दात देतात- ‘अध्यात्मविद्या’. ‘मी कोण आहे? माझं शुद्ध स्वरूप कसं आहे? जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी काय करायला हवं?’ अध्यात्मविद्या किंवा आत्मज्ञान याच्याशिवाय अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं दुसरी कोणतीही विद्या देऊ शकत नाही.
* इतर प्रत्येक विद्येचं किंवा ज्ञानशाखेचं क्षेत्र ठरलेलं आणि मर्यादित असतं.
उदा. खगोलशास्त्र म्हणजे अवकाशविज्ञान. आरोग्य, आहार, व्यायाम याविषयी कोणतंही मार्गदर्शन करू शकणार नाही. इतिहास- भूगोलाची अगदी सूक्ष्म माहिती किंवा विस्तृत ज्ञान दैनंदिन जीवनातील समस्यांची सोडवणूक करायला उपयोगी पडणार नाही.
याउलट मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी अध्यात्मविद्या पावलोपावली प्रभावी मार्गदर्शन करु शकते.
* गीतेत केलेलं समुपदेशन उपनिषदांवर आधारित आहे. ही अध्यात्मविद्या कशी मिळवायची याविषयी गीतेत म्हटलंय – तत् विद्धि प्रणिपातेन, परिप्रश्नेन, सेवयां म्हणजे ते आत्मज्ञान मिळवायचं असेल तर ज्यांना ते प्राप्त झालंय अशा अनुभवी लोकांना शरण जा (प्रणिपातेन), मनात येणारे सारे प्रश्न, शंका विचार (परिप्रश्नेन) आणि मुख्य म्हणजे त्या ज्ञानी व्यक्तीची सर्व प्रकारे सेवा कर. (सेवया) हीच गोष्ट ज्ञानदेवांनी एका रुपकाद्वारे सांगितलीय-
जे ज्ञानाचा कुरुठा | तेथ सेवा हा दारवंटा |
तो स्वाधीन करी सुभटा | वोळगोनी ॥
जसा एखाद्या झोपडीत (कुरुठा) प्रवेश करण्यासाठी प्रथम दारवंटा (उंबरा) ओलांडावा लागतो तसं सर्वप्रथम अनन्यशरण जाऊन, सर्व प्रकारची सेवा करून आपल्या प्रश्नांचं समाधान सद्गुरुंकडून करून घ्यावं लागतं.
तरी तनु मनु जीवें | चरणासी लागावें |
आणि अगर्वता करावें | दास्य सकळ ॥
अशी काया-वाचा-मने-जीवे-प्राणे सेवा केली की सद्गुरू प्रसन्न होऊन-
मग अपेक्षित जे आपुले | तेही सांगती पुसिले |
जेणे अंतःकरण बोधले | संकल्पा न ये ॥
यम-नचिकेता प्रसंगात असंच घडलं. त्यानं यमाची प्रत्यक्ष सेवा काही केली नाही. पण कित्येक प्रलोभनं नि लक्ष मुख्य लक्षापासून विचलित करणार्या अनेक वस्तू- व्यक्ती यमानं देऊ केल्या असतानाही तो आपल्या प्रश्नाशी चिकटून राहिला. त्यानं स्पष्ट सांगितलं, ‘ज्याअर्थी, हे यमराजा, तू माझ्या प्रश्नाच्या उत्तराच्या बदल्यात एवढं सारं लौकिक वैभव मला देऊ करत आहेस त्या अर्थी ते उत्तर या सर्वांपेक्षा महत्त्वाचं नि मौल्यवान आहे हे मी समजून चुकलोय. तेव्हा आता बाकी कशाचीही अनावश्यक चर्चा नकोच’.
याला म्हणतात खरा शिष्य आणि त्याची अस्सल ज्ञानजिज्ञासा! यानंतर यमधर्मानं आणखी परीक्षा न घेता सरळ नचिकेत्याच्या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ केला. या संदर्भात आद्य शंकराचार्य म्हणतात, ‘सच्चा शिष्य एका टोकाला नि आत्मानुभवी गुरू दुसर्या टोकाला असं असलं तरी दोघे एकाच मार्गावर असतात नि एकमेकाला जोडलेले असतात. सत्शिष्याच्या गर्भात सद्गुरू होण्याचं बीज दडलेलं असतं’.
इतक्या लहान वयात इतकी महान अवस्था नि ज्ञानजिज्ञासा (ज्ञानपिपासा म्हणजे तहान) असलेल्या नचिकेताला त्रिवार अभिवादन!