ॐकार साधनेचे महत्त्व

0
346

योगसाधना – ४७७
अंतरंग योग – ६२

  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधनेत देखील ‘ॐ ’ शब्दाला फारच महत्त्व आहे. कुठलेही योगसत्र सुरू करण्यापूर्वी तीन वेळी ॐ म्हटला जातो. ॐची कंपने सर्व शरीरात पसरतात. मन शांत होते आणि प्रत्येक भागांत व पेशीत चैतन्यसंचार होतो. पण हा मंत्र म्हणताना व्यवस्थित उच्चार हवा…

विश्‍वांत विविध विषय आहेत. प्रत्येक विषयांचे एक विशिष्ट असे तत्त्वज्ञान असते. मग तो विषय कुठलाही असो… भाषा, कला, विज्ञान, आहार, वैद्यकीय, इतिहास, भूगोल… फार मोठी यादी आहे. आपण त्यांतील काही विषय शिकतो. स्वत:च्या पेशासाठी असतो तो विस्ताराने शिकावा लागतो. कारण क्षणाक्षणाला त्याची गरज लागते. त्याशिवाय काही विषय आपल्याला आवडतात. छंदापोटी शिकतो. तसेच धर्म – हा असा विषय आहे की तो आम्ही नकळत पाळतो. त्याचा वेगळा अभ्यास करत नाही. त्यामुळे तो फक्त कर्मकांडात्मक करतो- केव्हा केव्हा कर्मकांड म्हणून तर जास्त करून भीतीपोटी. खरे म्हणजे हा विषय मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे धर्माचा आवडीने अभ्यास केला तर त्याचे पालन करताना तो बंधनकारक वाटत नाही. त्या कर्मकांडाला सुगंध येतो. उमेद-उत्साह वाढतो.
ह्या सर्व विषयांना जर अध्यात्माची जोड दिली तर त्यांचे महत्त्व तर वाढणारच पण त्याचबरोबर त्यांचा अभ्यास व पालन आनंदाने होईल. आपला तोच प्रयत्न आहे. योगसाधनेमध्ये तर आध्यात्मिक अर्थ अतिआवश्यक आहे.
चतुर्थी होऊन कित्येक दिवस मागे पडले. पण गणपतीच्या मूर्तीबद्दल आपला अभ्यास चालूच आहे. त्या संदर्भात आपण विविध मुद्दे थोडे खोलात बघितले. त्यातील सूक्ष्म भाव समजून घेतला. त्यामागील तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.

  • दूर्वा : आपण गणपतीला दूर्वा वाहतो. तसे पाहिले तर त्या एक लहानसे गवत आहे जे रस्त्यावर
    उगवते. आपण त्याला पायाखाली तुडवतो- अगदी नकळत, सहज. काही बागांमध्ये ‘टर्फ’ म्हणून वापरतो. पायांना मऊ लागण्यासाठी. पण असे म्हणतात की दूर्वांना लोहचुंबकीय अशी थोडी शक्ती असते. आणि आपण पायतणे न घालता उघड्या पायांनी चाललो तर आपल्या मज्जातंतूंतून जाणार्‍या कंपनांसाठी फायदा मिळतो. आयुर्वेदामध्ये दूर्वांना फार महत्त्व आहे.
    तसे पाहिले तर त्या दूर्वांना रंग, सुगंध काहीही नाही. सामान्य माणसाच्या मताप्रमाणे त्याची किंमत शून्य. प.पू. पांडुरंगशास्त्रींना त्या कर्मकांडामध्ये विविध मुद्दे दिसतात.
    १. आपण बघितले की गणपती म्हणजे, नेता- तत्त्ववेत्ता. अशा व्यक्ती- नेहमी ज्या लोकांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही- अशा लोकांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करून जीवन जगण्याची प्रेरणा देतात.
    २. ज्यांची जगाच्या दृष्टीने काही मत नाही असे कर्मदेखील प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते. त्याचप्रमाणे महापुरुषाजवळ जे कोणी प्रेमभावनेने येतात, त्यांना जे काही प्रेमाने देतात ते त्यांना आवडले पाहिजे.
    दूर्वा आपल्याला हेच सुचवतात.
  • लाल फूल : लाल फूल गणपतीला प्रिय आहे म्हणून त्याला वाहिले जाते. लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता व तत्त्ववेत्ता यांना क्रांती प्रिय असते. पण ती क्रांती जर दैवी असली तर ती समाजहिताची ठरेल.
    विश्‍वांत विविध तर्‍हेच्या क्रांत्या झाल्या आणि आताही होत आहेत. समाजातील व्यक्ती व्यक्तींच्या विचारांत फरक असला की क्रांती अपेक्षित आहेच. पण ती लोककल्याणासाठी असायला हवी. त्याशिवाय नेत्याबरोबर अनेक लोक असतात- लहानमोठे, सामान्य/असामान्य. नेत्याने सर्वांना प्रेमाने आदराने वागवायला हवे. लाल फुलाचा क्रांतीचा रंग व साधे गवत दूर्वा ही ह्याचे द्योतक आहेत.
  • अक्षता ः आपण देवाला अक्षता वाहतो.
    अक्षत- म्हणजे न तुटलेला (तांदळाचा दाणा)- जो खंडित नाही तर अखंड आहे. इथे आपल्या अखंड भक्तीची अपेक्षा आहे.
    *वक्रतुंड ः ह्यांतील गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ पू. पांडुरंगशास्त्री छान समजवतात. ऋद्धिसिद्धींपासून मुख फिरवून राहणार्‍यालाच ऋद्धिसिद्धी मिळतात. म्हणून म्हणतात- ‘‘न मागे तयाची रमा होय दासी’’
    त्याचप्रमाणे वक्रतुंडाची व्याख्या ते सांगतात.
    ‘‘वक्रान्-तुंडपति इति वक्रतुंड- अर्थात वाकडे-तिकडे चालणार्‍याला, आडव्या रस्त्याने जाणार्‍याला जो दंड देतो तो वक्रतुंड. नेता व तत्त्ववेत्ता त्या अर्थाने वक्रतुंड असला पाहिजे.
    गणपतीच्या ह्या सर्व संदर्भांचा आपण सखोल अभ्यास व विचार केला की आपल्याला कळते की स्वत:ला तत्त्ववेत्ता व नेता म्हणवणार्‍याने कितीतरी गुण कमवायला हवेत. आता स्वार्थासाठी काम करणार्‍यांना काहीही बंधने नाहीत. पण स्वत:बरोबर लोककल्याणाचा व समाजहिताचा विचार करणार्‍यानी तर हे सर्व मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
  • ‘‘गणपती पूजन’’
    भारतात कुठलेही शुभकार्य असले- कुटुंबांत, मंदिरात व समाजात, तर सर्वप्रथम श्रीगणपतीचे पूजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कार्यसिद्धी होते अशी दृढ श्रद्धा आहे.
    आपण पाहिल्याप्रमाणे सामाजिक नेता व तत्त्ववेत्ता हेदेखील नेते आहेत- म्हणजेच प्रथम पूजनीय. इथे समाजांतसुद्धा असेच मानतात की त्यांना हा मान दिल्याने पुढील कामे सुरळीत होतात. त्यांचे मार्गदर्शन मिळते. केव्हा केव्हा आर्थिक व इतर मदत मिळते. आत्ताच्या समाजात हेंच दिसते.
    पू. शास्त्रीजींना आध्यात्मिक अर्थ दिसतो. ते म्हणतात की आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. त्या गणांचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी हा आपला गणपती- म्हणजे मन- ठिकाणावर असायला हवा. ह्याचा गर्भितार्थ- आपल्या मनाला कार्याच्या प्रारंभातच शांत व स्थिर करायचे असते. त्यामुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे व सरळपणे पार पडते.
  • ‘‘गणपती विसर्जन’’
    गणेश चतुर्थीला पूजन केलेल्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशीला करतो. ह्यामध्ये शास्त्रीजींना विविध आध्यात्मिक मुद्दे दिसतात-
  • जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला विदाकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे.
    इथे त्यांना गर्भितार्थ दिसतो – जीवनात व्यक्तिपूजेपासून सुरुवात करून तत्त्वपूजेत त्या आरंभाचे पर्यवसान केले पाहिजे. शेवटी आपण तत्त्वच प्रमाण मानले आहे. सारांंश, गणपतीचे विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वांत भगवान पाहणे आपल्याला कदाचित कठीण जात असेल तर सर्व भगवंताचे आहेत म्हणून माझे बंधू आहेत. आपले सर्वांचे ‘देवी नाते आहे एवढे तर आपण अवश्य समजू शकतो.’ – ‘दैवी मातृभाव’
  • ‘ॐ’- ह्या शब्दाला भारतीय संस्कृतीत फारच महत्त्व आहे. ह्या ॐकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणायचे काम गणेश मूर्तीने केलेले आहे, अशी मान्यता महान व्यक्तीची आहे.
    ज्ञानेश्‍वर महाराज ज्ञानेश्‍वरीत म्हणूनच म्हणतात-
    ‘अकार चरण युगुल’ उकार उदर विशाल’
    मकार महामंडल मस्तकाकारे’ (ज्ञानेश्‍वरी-१/१३)
    ‘अ’ कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन,
    ‘उ’ कार म्हणजे विशाल पोट,
    ‘म’ कार म्हणजे त्याचे मस्तक.
    ज्ञानेश्‍वर माउली अशी सुंदर, मोहक, रसमय कल्पना करतात.
    ‘ॐ’ शब्द तीन अक्षरांचा आहे- अ,उ,म्.
    संत तुकाराम महाराज म्हणतात-
    ‘ओंकारप्रधान रूप गणेशाचे
    ते तिन्ही देवांचे जन्मस्थान’
    अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू
    मकार महेश जाणियेला’’
    ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न
    तो हा गजानन मायबाप’
    तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
    पहावी पुराणी व्यासाचीया’’
    योगसाधनेत देखील ‘‘ॐ ’’ शब्दाला फारच महत्त्व आहे. कुठलेही योगसत्र सुरू करण्यापूर्वी तीन वेळी ॐ म्हटला जातो. ॐची कंपने सर्व शरीरात पसरतात. मन शांत होते आणि प्रत्येक भागांत व पेशीत चैतन्यसंचार होतो. पण हा मंत्र म्हणताना व्यवस्थित उच्चार हवा- तोही कोमल, मधुर, भावपूर्ण आवाजात, त्यामागील गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ समजून असे उच्चारण केले तर सत्राच्या सुरुवातीपासूनच एक सुंदर आल्हाददायक वातावरण निर्मिती होते व चित्त एकाग्र होते. योगसाधनेचे सर्व पैलू- प्रार्थना, शिथिलीकरण, आसने, कपालभाती, प्राणायाम, ध्यान…
    शास्त्रशुद्ध योगसाधनेची हीच बैठक आहे. योग फक्त कर्मकांडात्मक न करता सर्व पैलूंचा समावेश हवा- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. त्यांतील काही पैलू आपल्या प्रत्येक धार्मिक विधीतदेखील अपेक्षित आहेत.
    श्रीगणेश आपल्याला गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हेंच समजावतात.
    आपल्या योगसाधकाना हे सर्व ज्ञान आहे. गरज आहे तें त्यांनी इतराना समजावून सांगण्याची.
    (संदर्भ : संस्कृतीपूजन- प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले)