वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडीजच्या कोणत्याही गोलंदाजाला मागील २० वर्षांत शक्य न झालेले रँकिंग गुणदेखील होल्डर याने मिळविले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४२ धावांत ६ बळींसह सामन्यात एकूण ७ बळी घेतले होते. कारकिर्दीतील सर्वोत्तम ८६२ रेटिंग गुणदेखील होल्डरने मिळविले आहेत. ऑगस्ट २००० मध्ये कर्टनी वॉल्श याने ८६६ गुणांपर्यंत मजल मारली होती. यानंतर याच्या जवळपास मजल मारणारा होल्डर हा विंडीजचा पहिलाच गोलंदाज आहे. फलंदाजी विभागात विराट कोहली याने आपले दुसरे स्थान राखले आहे.
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे अनुक्रमे सातव्या व नवव्या स्थानी कायम आहेत. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह हा सातव्या स्थानासह ‘टॉप १०’मधील एकमेव भारतीय आहे. होल्डर फलंदाजांच्या यादीत ३५व्या तर अष्टपैलूंमध्ये ४८५ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ४३१ गुणांसह स्टोक्स दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या कसोटीत ४३ व ४६ धावा केलेल्या स्टोक्सने फलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी झेप घेतली आहे. सामन्यातील ६ बळींसह स्टोक्सने तीन स्थानांची सुधारणा करत २३व्या स्थानावर हक्क सांगितला आहे.