होंडा – तिस्क येथे आपल्याच मुलीचा निर्घृण खून केलेल्या शंकर रेड्डी याला काल वाळपई न्यायालयाने चार दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, बापाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या मॉंगौरी या दुसर्या मुलीची वाळपईचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी काल पुन्हा एकदा जबानी घेतली. पण तिने काल सांगितल्यानुसार जबानी दिली. तर आरोपी शंकर याने आपल्या मुलीची वागणूक पसंत नव्हती म्हणून रागाच्या भरात आपल्या हातून कृत्य घडल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, खून करण्यामागे अन्य काही कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, बांबोळी येथील गोमेकॉत उपचार घेत असलेली मॉंगौरी हिची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यावेळी तिच्या डोक्यावर तसेच हातावर कोयत्याने वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली होती.