देशातील हॉटेलांमधून तसेच फास्ट फूट गाड्यांवरून दिले जाणारे २० टक्के अन्नपदार्थ हे भेसळयुक्त असतात, अशी धक्कादायक माहिती सरकारी आकडेवारीवरून पुढे आली आहे.
२०१३-१४ काळात विविध सरकारी प्रयोगशाळांमधून तपासलेल्या ४६ हजार २८३ अन्नपदार्थांच्या नमुन्यांपैकी ९२६५ नमुने हे भेसळयुक्त किंवा बनावट ब्रँडचे असल्याचे आढळून आले. या नमुन्यांत प्रामुख्याने दूध, दूग्धजन्य पदार्थ, खाद्य तेल, मसाले यांचा समावेश होता.
या भेसळीत उत्तर प्रदेशचा क्रमांक पहिला तर महाराष्ट्राचा दुसरा लागतो. येथे २९३० दुकानदारांना पकडण्यात आले पैकी १९१९ दोषी सिद्ध झाला. त्यांच्याकडून ४.४७ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसुल करण्यात आला. महाराष्ट्रात एकुण २५५७ जणांना पकडण्यात आले पैकी केवळ ६६ जणांनाच शिक्षा होऊ शकली.
हरयाणात २६० प्रकरणे नोंद झाली पैकी १६६ जणांना दोषी ठरवून २६ लाख ६१ हजार ८०० रुपये दंड वसुलण्यात आला. उत्तराखंडमध्ये १२२, झारखंडमध्ये ९९, बिहारमध्ये ९०, दिल्लीत ६१ प्रकरणे नोंद झाली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरात अन्न सुरक्षा आणि प्रमाणके कायदा २००६ अन्वये सातत्याने अन्न पदार्थांचे नमुने राज्यातील अधिकारिणीमार्फत तपासले जातात. पदार्थांचा दर्जा कायद्यास आवश्यक असलेला नसेल तर कारवाई केली जाते.