हॉकीत ४१ वर्षांनंतर भारताची पदक कमाई

0
73

>> ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

>> कुस्तीत रवीकुमार दहियाची रौप्य पदकाला गवसणी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी काल गुरूवारचा दिवस भाग्याचा दिवस ठरला. काल भारताने एक रौप्य व एका कास्य अशा दोन पदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीच्या संघावर ५-४ अशी मात करत कांस्य पदक पटकावले.

भारताच्या हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी पदक जिंकत इतिहास घडवला आहे. तर कुस्तीमध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवकडून भारताच्या रवीकुमारला ७-४ असा पराभव पत्करावा लागला.

४१ वर्षांनी हॉकीत पदक
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील ४१ वर्षापासूनचा पदकांचा दुष्काळ संपवत काल कांस्य पदकासाठी झालेला जर्मनीविरुद्धचा सामना जिंकला. जर्मनीवर मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयाने १९८० नंतर भारताने ऑलम्पिकमध्ये पदक जिंकले. याआधी भारताने १९८०मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा भारताला सुवर्णपदक मिळाले होते.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये याआधी भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य, मुष्टियुद्धात लवलिना बोर्गोहेन हिने कांस्य पदक जिंकून दिले होते. तर काल गुरूवारी हॉकीत कांस्य तर कुस्तीत मिळालेल्या रौप्य पदकामुळे भारताची तीन कांस्य व दोन रौप्य अशी मिळून एकूण ५ पदके झाली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी, ऐतिहासिक! हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात राहील. कांस्य पदक जिंकणार्‍या पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा. भारताला आपल्या हॉकी संघावर गर्व आहे, असे ट्वीट केले. यानंतर पंतप्रधानांनी हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोन केला व संघाचे अभिनंदन केले.