हॉंग-कॉंगमधील आग शमेल?

0
215
  •  दत्ता भि. नाईक

दिवसेंदिवस चिघळणारी परिस्थिती पाहता चीन व हॉंग-कॉंगचे संबंध एक देश- दोन व्यवस्था याकडून एक देश- दोन राष्ट्रीयत्वे याकडे वाटचाल करणार तर नाही ना? अशी शंका येते. ही आग शमेल की अशीच भडकत राहील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.

यंदा १ ऑक्टोबर रोजी पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने आपला सत्तरावा वर्धापनदिन मोठ्या हर्षो-उल्हासाने साजरा केला. राजधानी बिजिंग येथे शक्तिप्रदर्शनासाठी सेनादलांचे संचलन, अध्यक्ष शी जीन पिंग यांनी स्वीकारलेली मानवंदना असा हा भारावून टाकणारा कार्यक्रम होता. भारतासारख्या लोकशाही देशाला प्रजासत्ताकदिनी शक्तीचे प्रदर्शन करावे लागते. चीनवर तर कम्युनिस्ट पार्टीची एकपक्षीय राजवट आहे. प्रजासत्ताकाचे नाव पिपल्स रिपब्लिक असले तरी सत्ता चालते ती पक्षाला एकनिष्ठ असलेल्या सेनादलांमुळे. पक्ष त्यांचे महत्त्व कमी करू शकत नाही व त्यांना वरचढही होऊ देऊ शकत नाही. माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीला सत्तर वर्षे झाली. या घटनेला जागतिक राजकारणात बरेच महत्त्व असले तरी वृत्तसंस्था व प्रसारमाध्यमांनी या घटनेला फार उचलून धरले नाही. याउलट गेले चार-पाच महिने चालू असलेल्या हॉंग-कॉंग या चीनच्या प्रांतात लोकशाही हक्कासाठी चालू असलेल्या आंदोलनाला सहजपणे प्रसिद्धी मिळत चालली आहे.

चिनी सत्ताधार्‍यांनी बनवलेले प्रत्यार्पणाचे विधेयक हेच या समस्येचे मूळ आहे. या कायद्यानुसार बिजिंग येथील केंद्र सरकारला हव्या असलेल्या आरोपीला हॉंग-कॉंगमधून अटक केली जाऊ शकते. हा कायदा चिनी मुख्य भूमीवरून हॉंग-कॉंगमध्ये येऊन लपलेल्या आरोपीस लागू असता तर त्याला आक्षेप घेण्यासारखे काहीही नव्हते; परंतु हा कायदा हॉंग-कॉंगमधील लोकांना लागू होणार व चिनी सरकार विरोधकांचा छळ करण्यासाठी याचा राजरोसपणे वापर करणार याची येथील जनतेला खात्री असल्यामुळे हे आंदोलन सुरू झालेले आहे व ते काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही. चिनी राज्यकर्त्यांचे आंदोलन ची-नझी या शब्दात वर्णन करतात. यापूर्वी २०१४ मध्ये लोकशाही अधिकारांसाठीही हॉंग-कॉंगमध्ये आंदोलन पेटले होते. स्वसंरक्षणार्थ छत्र्या बरोबर घेऊन आलेल्यांना त्यावेळेस ‘अंब्रेला रिव्होल्युशनरी’ म्हणून ओळखले गेले होते. त्यावेळेसही सरकार बेदरकारपणे वागले होते.

१ ऑक्टोबरचा तथाकथित राष्ट्रीय दिवस साजरा होण्यापूर्वीच जून महिन्यापासून या आंदोलनाने पेट घेतला.

हॉंग-कॉंगच्या मुख्याधिकारी कॅरी लाम या सुरुवातीला थोडीसुद्धा माघार घेण्यास तयार नव्हत्या. त्यानंतर बिजिंग सरकारकडूनच सूट मिळाल्यामुळे असेल पण या विषयावर दोन पावले मागे सरकण्यास त्या तयार होत्या. चीनमध्ये संसद, शासन, न्यायव्यवस्था व वर्तमानपत्रे सर्वकाही सरकारच्या बाजूने आहे. कम्युनिस्ट पक्षाला विरोध करणार्‍याला देशद्रोही ठरवून फासावर लटकावले जाऊ शकते व तो घरी झोपल्या ठिकाणी मरण पावला अशी वृत्तपत्रांतून बातमी येऊ शकते.

दहा हजारहून अधिक लोक रस्त्यावर
१९९७ साली इंग्रज सत्ताधार्‍यांनी हॉंग-कॉंगवरील कब्जा सोडून तो चिनी सरकारच्या हातात दिला होता, तेव्हा तेथील व्यापारी अर्थव्यवस्था तशीच चालू ठेवणार असा करार झाला होता. ‘वन कंट्री टू सिस्टम्स’ म्हणजेच एक देश दोन व्यवस्था असा या कराराचा अर्थ लावला गेला होता. हा करार अर्थातच पन्नास वर्षांसाठी आहे. २०२२ या वर्षी या करारातील पंचवीस वर्षे संपत आहेत व चिनीकरणाची गती वाढत आहे ही रास्त भीती हॉंग-कॉंगमधील जनतेच्या मनात वास करत आहे. मोठ्या प्रमाणात चालू असलेली चिनी कामगारांची आवक व चिनी गृहनिर्मिती करणार्‍या कंत्राटदारांनी व्यवसायावर केलेला कब्जा यामुळे जनता हवालदिल झाली आहे.
१५ जून रोजी जनतेने फार मोठे आंदोलन चालवले. १२ जून रोजी पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता जमलेला जमाव शासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला, तेव्हापासून रोज कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हे आंदोलन चालूच आहे.

शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी आंदोलनाने उग्र रूप धारण केले. २०१४ साली मर्यादित लोकशाही प्रदान करण्याच्या चिनी सरकारने दिलेल्या आश्‍वासनाला या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळेसही या मर्यादित लोकशाहीवर संतुष्ट नसलेल्यांनी आंदोलन चालवले होते. त्या अम्ब्रेला आंदोलनाचा पाचवा स्मृतिदिन आंदोलकांनी उग्र प्रतिक्रिया देऊन साजरा केला. सरकारने लोकशाहीवादी संसद सदस्य व नेत्यांना पूर्वीच अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मोर्चा काढण्याची परवानगी नसतानाही दहा हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरल्याचे वृत्त आहे. आंदोलकांमध्ये भीती उत्पन्न करण्याकरिता वरून सरकारी हॅलिकॉप्टर घिरट्या घालत होते. विशेष कृती दलाच्या पोलिसांनी अश्रुधूर, मिरी स्प्रे, पाण्याचे फवारे यांचा वापर केला. हॉंग-कॉंगच्या संसदेच्या मुख्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. कम्युनिस्ट पक्षाच्या हातात जेव्हा सत्ता नसते तेव्हा प्रस्थापित सरकारच्या आस्थापनांवर मोलरोव्ह कॉकटेल नावाचे पेट्रोल बॉम्ब फेकून मारण्याची कला पक्षानेच आपल्या कार्यकर्त्यांसाठी विकसित केली होती. आज तीच कला त्यांच्या विरोधात वापरली जात आहे.

राष्ट्रीय नव्हे, दुखवट्याचा दिवस
बिजिंगमध्ये महोत्सवाची तयारी चालू असतानाच हॉंग-कॉंगच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, तैवान, याशिवाय युरोपमधील चाळीस स्थानांवर व उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये २९ सप्टेंबर रोजी निदर्शनांचे आदोलन करण्यात आले. अजून इतर देशांतील माहिती पुढे यायची शिल्लक आहे. सर्वसत्ता अधिकरणाविरुद्ध केलेली ही निदर्शने आहेत असेच आयोजकांकडून सांगण्यात आले.

१ ऑक्टोबर हा दिवस हॉंग-कॉंगमध्ये दुखवट्याचा दिवस म्हणून पाळण्यात आला. मुख्याधिकारी कॅरी लाम राजधानी बिजिंगमधील महोत्सवास उपस्थित होत्या. हॉंग-कॉंगमध्ये हा दिवस फार जोशात साजरा न करता साध्या पद्धतीनेच पाळण्यात आला. अगोदर ठरलेले फटाके व रोषणाईचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. आंदोलकांशी झालेल्या झटापटीत शंभरहून अधिक लोक जखमी झाले. यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आंदोलकांमध्ये अठरा वर्षांच्या एका युवकाचाही समावेश होता. चंटर गार्डन येथे जमलेल्या विद्यार्थ्यांनी मरण पावलेल्या त्यांच्या सहाध्यायींना श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी सुयेन वान पब्लिक हो च्युएन यू मेमोरियल कॉलेजसमोर निदर्शने करून पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी २६९ जणांना ताब्यात घेतले असून त्यात १७८ पुरुष व ९१ महिलांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी १४०० अश्रुधुराच्या नळकांड्या व ९०० रबरी गोळ्यांचा वापर केला. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात पाच पोलिस अधिकार्‍यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील एकाचे अंग बर्‍याच अंशी भाजले आहे.

चिघळणारी परिस्थिती
आंदोलकांनी मुखवटे वापरू नयेत म्हणून सामाज्यकालीन आणीबाणीचा कायदा लागू करण्याच्या विचारात सध्या सरकार आहे. दहा ते बारा हजार पोलीस व तीन हजार ते पाच हजार सैनिक असा ताफा हॉंग-कॉंगवर तुटून पडण्यासाठी आदेशाची वाट पाहात आहे. कॅरी लाम बिजिंगमध्ये असल्यामुळे त्यांचा सहाय्यक मॅथ्यू येऊंग याने हॉंग-कॉंगमधील लोकांना भासणारा घरांचा तुटवडा यासारख्या प्रश्‍नांकडे लक्ष पुरवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केलेेले आहे. २०१४ साली लोकशाही अधिकारांसाठी तयार केलेले प्रारूप अजूनही धूळ खात पडलेले आहे. त्याची कार्यवाही करायला कोणीही तयार नाही. २८ सप्टेंबर रोजी स्थानिक सरकारकडून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या सरकारने दिलेल्या आश्‍वासनावर काडीचाही विश्‍वास ठेवण्यास कुणीही तयार नाही.

७ ऑक्टोबर हा चिनी परंपरेप्रमाणे मृतात्म्यांचा स्मरण दिवस आहे. यंदा हॉंग-कॉंगमध्ये हा दिवस धार्मिक परंपरेप्रमाणे पाळला गेला. बंदिस्त अर्थव्यवस्थेतून बाहेर पडणार्‍या कम्युनिस्ट चीनसाठी हॉंग-कॉंग म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. व्यापार व धंदा वाढवण्यासाठी चीनने हॉंग-कॉंगचा बराच वापर आतापर्यंत केला, हे लक्षात आल्यामुळे व अधिकारांची मुस्कटदाबी झाल्यामुळे जनतेमधील उद्रेक उफाळून आलेला आहे. हॉंग-कॉंग हे व्यापाराचे जागतिक केंद्र आहे. येथे व्यवहार बंद असून चालत नाही. गेले चार महिने बरेच उद्योग मंदावलेले आहेत. पर्यटनाचे केंद्र असलेले हे ऐशआरामी लोकांचे आवडते ठिकाण. सध्या पर्यटन उद्योग ठप्प आहे. हे आंदोलन कुठपर्यंत चालेल हा एक मोठा प्रश्‍न आहे. पूर्व पाकिस्तान जसे पाकिस्तानमधून फुटून निघून बांगला देशची निर्मिती झाली, तसेच हॉंग-कॉंग चीनपासून वेगळे होणार काय? आज चीनवर जो झंडा फडकतो तो त्यांचा राष्ट्रध्वज नव्हे; तो सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा आहे. एकेकाळी सोव्हिएत रशियावरही असाच कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा फडकत होता. आता या देशावर रशियाचा मूळ राष्ट्रध्वज फडकत आहे. १ ऑक्टोबर हा काही चिनी राष्ट्रीयत्वाचे प्रतिनिधित्व करणारा दिवस नव्हे. त्यामुळे चीन व हॉंग-कॉंगमधील प्रजा एकाच वंशाची असूनही त्यांच्यामध्ये विस्तव जात नाही. कित्येक आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला असला तरी चीनशी दोन हात करण्याची तयारी असलेली महासत्ता त्यांच्या पाठीशी असली पाहिजे. सध्यातरी तशी कोणतीही शक्यता दिसत नाही. दिवसेंदिवस चिघळणारी परिस्थिती पाहता चीन व हॉंग-कॉंगचे संबंध एक देश- दोन व्यवस्था याकडून एक देश- दोन राष्ट्रीयत्वे याकडे वाटचाल करणार तर नाही ना? अशी शंका येते. ही आग शमेल की अशीच भडकत राहील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.