>> तब्बल ८ षटकारांसह मनीष पांडेने चोपल्या नाबाद ८३ धावा
सनरायझर्स हैदराबादने काल गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा ८ गडी व ११ चेंडू राखून दारुण पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा ४०वा सामना एकतर्फी झाला. राजस्थानने विजयासाठी ठेवलेले १५५ धावांचे किरकोळ लक्ष्य हैदराबादने १८.१ षटकांत केवळ २ गडी गमावून गाठले. विजय शंकर व मनीष पांडे यांनी तिसर्या गड्यासाठी केलेली १४० धावांची अविभक्त भागीदारी हैदराबादच्या विजयाची खासियत ठरली. कालच्या पराभवामुळे राजस्थानचा संघ स्पर्धेबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून हैदराबादला ‘प्ले ऑफ’ची अजूनही संधी आहे.
धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरने बॅअरस्टोव व वॉर्नर या सलामीवीरांना झटपट तंबूत पाठवत हैदराबादची २ बाद १६ अशी स्थिती केली. सुरुवातीच्या या दोन धक्क्यातून सावरताना हैदराबादने सहज विजय साकार केला. मनीषने ८ षटकार व ४ चौकारांसह केवळ ४७ चेंडूंत नाबाद ८३ तर विजय शंकरने ५१ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या.
तत्पूर्वी, रॉबिन उथप्पा व बेन स्टोक्स यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. ३.२ षटकांत ३० धावांची वेगवान सलामी देत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्याची तयारी ही जोडी करत असतानाच समन्वयाच्या अभावामुळे उथप्पाला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. या धक्क्यानंतर राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लागला. स्टोक्स व संजू सॅमसन यांनी दुसर्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. परंतु. धावगती राखण्यात ही जोडी कमी पडली. स्टोक्सने ३० धावांसाठी ३२ चेंडूंचा सामना केला. बाराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजू व तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टोक्स बाद झाल्याने राजस्थानचा संघ १ बाद ८६ वरून ३ बाद ८६ अशा संकटात सापडला. मधल्या फळीला बळकटी मिळवून देण्यासाठी सलामीऐवजी चौथ्या स्थानी उतरलेला जोस बटलर (९) अपयशी ठरला. कर्णधार स्मिथने १५ चेंडूंत १९ व रियान परागने १२ चेंडूंत २० धावा जमवल्या. शेवटी जोफ्रा आर्चर याने ७ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह नाबाद १६ धावा चोपल्याने राजस्थानला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारणे शक्य झाले. हैदराबादकडून होल्डरने प्रभावी मारा करत ३३ धावांत ३ गडी बाद केले. राजस्थानने नटराजनची गोलंदाजी लक्ष्य करत त्याच्या ४ षटकांत ४६ धावा चोपल्या. परंतु, विजय शंकर व शहाबाज नदीम यांनी पाचव्या गोलंदाजांचा कोटा अवघ्या २४ धावांत पूर्ण केल्याने ‘महागड्या’ नटराजनची किंमत हैदराबादला मोजावी लागली नाही. सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात दोन बदल केले. दुखापतग्रस्त झालेला फलंदाज केन विल्यमसन याच्या जागी त्यांनी वेस्ट इंडीजचा अष्टपैलू जेसन होल्डर याला उतरवले तसेच मागील सामन्यात महागडा ठरलेल्या बासिल थम्पी याला वगळून डावखुरा फिरकीपटू शहाबाज नदीमला संधी दिली. राजस्थान रॉयल्सने संघात बदल केला नाही.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः रॉबिन उथप्पा धावबाद १९, बेन स्टोक्स त्रि. गो. राशिद ३०, संजू सॅमसन त्रि. गो. होल्डर ३६, जोस बटलर झे. नदीम गो. शंकर ९, स्टीव स्मिथ झे. पांडे गो. होल्डर १९, रियान पराग झे. वॉर्नर गो. होल्डर २०, राहुल तेवतिया नाबाद २, जोफ्रा आर्चर नाबाद १६, अवांतर ३, एकूण २० षटकांत ६ बाद १५४
गोलंदाजी ः संंदीप शर्मा ४-०-३१-०, जेसन होल्डर ४-०-३३-३, विजय शंकर ३-०-१५-१, थंगरसू नटराजन ४-०-४६-०, राशिद खान ४-०-२०-१, शहाबाज नदीम १-०-९-०
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. स्टोक्स गो. आर्चर ४, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. आर्चर १०, मनीष पांडे नाबाद ८३ (४७ चेंडू, ४ चौकार, ८ षटकार), विजय शंकर नाबाद ५२ (५१ चेंडू, ६ चौकार), अवांतर ७, एकूण १८.१ षटकांत २ बाद १५६
गोलंदाजी ः जोफ्रा आर्चर ४-०-२१-२, अंकित राजपूत १-०-११-०, कार्तिक त्यागी ३.१-०-३२-०, बेन स्टोक्स २-०-२४-०, श्रेयस गोपाळ ४-०-३२-०, राहुल तेवतिया ४-०-२५-०