सामन्याच्या प्रारंभीच ७व्या मिनिटाला निशू कुमारने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर बेंगळुरू एफसीने हैदराबाद एफसी संघावर १-० अशी निसटती मात करीत हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत दुसरे स्थान गाठले.
हैदराबादला पेनल्टीसह अनेक संधी मिळाल्या होत्या, पण बेंगळुरूचा हरहुन्नरी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याने दरवेळी यजमान संघाचा श्री कांतीरवा स्टेडियमवरील बालेकिल्ला अबाधित राखला. बेंगळुरूने १५ सामन्यांत आठवा विजय मिळविला असून चार बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २८ गुण झाले. त्यांनी एटीके एफसीला एका गुणाने मागे टाकले. एटीकेचे १४ सामन्यांतून २७ गुण आहेत. एफसी गोवा १५ सामन्यांतून ३० गुणांसह आघाडीवर आहे. चौथ्या क्रमांकावरील ओदीशा एफसीचे १५ सामन्यांतून २१ गुण आहेत.
बेंगळुरूने खाते उघडताना सेट-पिसेसवरील कौशल्य प्रदर्शित केले. सातव्या मिनिटाला उजवीकडे मिळालेला कॉर्नर डिमास डेल्गाडो याने घेतला. त्यावेळी पूर्वनियोजीत डावपेच असल्याप्रमाणे निशूने हालचाल केली आणि ताकदवान फटका मारला. त्याने हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला कोणतीही संधी दिली नाही.
हैदराबादला २३व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. निखील पुजारीने मध्य क्षेत्रातून मार्सेलिनीयोला पास दिला.
मार्सेलिनीयोने चकवून आगेकूच करताच सुरेश वांगजामने त्याला गोलक्षेत्रालगत रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मार्सेलिनीयोने गोलक्षेत्रात पडला. त्यामुळे पंच तेजस नागवेंकर यांनी हैदराबादला पेनल्टी बहाल केली. मार्को स्टॅन्कोविचने नेहमीच्या शैलीत हळू धावत येत फटका मारला, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने तो रोखला. चेंडू नेटच्या डाव्या कोपर्याच मारण्याचा त्याचा प्रयत्न रोखला आणि गुरप्रीतने चपळाईने चेंडू थोपविला. बोबोने नंतर प्रयत्न केला, पण तो सुद्धा गुरप्रीतने अपयशी ठरविला. त्यामुळे मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही.