>> कळंगुट पोलिसांची कामगिरी, संशयितावर 31 गुन्हे नोंद
एका हॉटेलच्या खोलीत झालेल्या चोरीप्रकरणी कळंगुट पोलिसांनी साईकिरण रेड्डी (24) या मूल सुर्यानगर तेलंगणा हैदराबाद येथील संशयित चोरट्याला केरळमधील किन्नर रेल्वेस्थानकावर अटक केली. संशयित साईकिरण हा सराईत चोर असून त्याच्याविरुद्ध हैदराबादमध्ये 31 गुन्हे नोंद असून त्यातील 11 गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली आहे. साईकिरणकडून 4 मोबाईल, 1 सोनसाखळी, 10 हजार रुपये रोख रक्कम व एक चांदीचा दागिना पोलिसांनी जप्त केला आहे.
कळंगुटमध्ये झालेली चोरी
गेल्या 31 जुलै रोजी कळंगुटमधील एका हॉटेलच्या खोलीत शिरून सत्यशील शर्मा या मध्यप्रदेशमधील पर्यटकाचा मोबाईल व रोख रक्कम असा 65 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये चोरीचा चेहरा बंदिस्त झाला होता. कळंगुट पोलिसांनी या फुटेच्या आधारे चौकशी केली असता संशयित आरोपी केरळच्या दिशेने निघाल्याची माहिती हाती लागली. त्यानुसार पोलीस पथक लगेच केरळच्या दिशेने रवाना झाले व संशयिताला केरळमधील किन्नर रेल्वे स्थानकावर पकडले. पोलिसांनी संशयिताला गोव्यात आणून अटक केली. यावेळी त्याची चौकशी केली असता जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सापडलेला मोबाईल व रोख रक्कम ही कळंगुटमधील चोरीतील असल्याचे तसेच इतर वस्तू हैदराबादमधील चोरीच्या असल्याचे उघड झाले. याबाबतची माहिती कळंगुट पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना दिली आहे. कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक प्रजित मांजरेकर व पथकाने ही कारवाई केली. दरम्यान साईकिराण रेड्डी हा कळंगुटमध्ये चोरी करून केरळमार्गे हैदराबाद येथे जात होता. त्याच्याविरुद्ध हैदराबादमध्ये विविध पोलीस स्थानात चोरीचे 31 गुन्हे नोंद आहेत.