>> विल्यमसनची ६३ धावांची कप्तानी खेळी
>> १५१ धावांचा यशस्वी बचाव
सनरायझर्स हैदराबादने आपली गोलंदाजी यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत बलाढ्य असल्याचे काल रविवारी पुन्हा एकदा दाखवून दिले. प्रथम फलंदाजी करताना केवळ ७ बाद १५१ धावा केल्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्सचा डाव १४० धावांवर रोखून ११ धावांनी विजय मिळविला. या विजयासह त्यांनी ८ सामन्यांतून ६ विजय व २ पराभवांसह आपली गुणसंख्या १२ करताना अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
विजयासाठी १५२ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. संदीप शर्माने राहुुल त्रिपाठीची यष्टी वाकवत त्यांच्यावर दबाव टाकला. अजिंक्य रहाणे (नाबाद ६५, ५३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) व संजू सॅमसन (४० धावा, ३० चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांनी डाव सावरताना दुसर्या गड्यासाठी ५९ धावा जोडल्या. दहाव्या षटकात सॅमसन परतल्यानंतर राजस्थानच्या विजयाच्या आशादेखील मावळल्या. बेन स्टोक्स (०), जोस बटलर (१०) या आक्रमक फलंदाजांनी निराशा केल्यामुळे राजस्थानवर पराभव ओढवला. पहिल्या दहा षटकात ७२ धावा केलेल्या राजस्थानला शेवटच्या १० षटकांत केवळ ६८ धावा करणे शक्य झाले. या पराभवामुळे त्यांची गुणसंख्या सहाच राहिली आहे. त्यांनी सात सामने खेळले असून ३ विजय व ४ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.
तत्पूर्वी, सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे हेल्स व धवन यांनी हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. डावातील तिसर्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गौतमने शिखर धवनचा वैयक्तिक ६ धावांवर त्याचा त्रिफळा उडवून राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. गोलंदाजांना मदत करणार्या या खेळपट्टीवर हेल्स व कर्णधार विल्यमसन यांनी सावध पवित्रा घेताना अधिक धोके पत्करले नाही. खराब चेंडूंचा समाचार घेताना चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचे या द्वयीने चुकविले नाही. दुसर्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी रचताना या दोघांनी संघाला शतकी वेस ओलांडून दिली. ही भागीदारी धोकादायक ठरत असताना गौतमने हेल्सला वैयक्तिक ४५ धावांवर बाद केले. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार लगावले. पुढच्याच षटकात कर्णधार केन परतला. त्याने ४३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६३ धावांची कप्तानी खेळी केली. यानंतर मात्र हैदराबादच्या इतर फलंदाजांना शेवटच्या पाच षटकांत वेगाने धावा जमवता आल्या नाही. हाणामारीच्या षटकांत हैदराबादच्या फलंदाजांनी केवळ ३१ धावा केल्या. या प्रयत्नात त्यांचे ४ गडी बाद झाले. निर्धारित २० षटकांत ७ बाद १५१ पर्यंत त्यांनी मजल मारली. सनरायझर्सने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल करताना अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी याला वगळून इंग्लंडचा सलामीवीर आलेक्स हेल्सला आयपीएल पदार्पणाची संधी दिली. दुसरीकडे रॉयल्सने न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधी व देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून खेळणार्या महिपाल लोमरोर यांना उतरवताना दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासें व लेगस्पिनर श्रेयस गोपाळला बाहेर बसविले.
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः आलेक्स हेल्स झे. सॅमसन गो. गौतम ४५, शिखर धवन त्रि. गो. गौतम ६, केन विल्यमसन झे. बटलर गो. सोधी ६३, मनीष पांडे झे. रहाणे गो. उनाडकट १६, शाकिब अल हसन त्रि. गो. आर्चर ६, युसूफ पठाण झे. कुलकर्णी गो. आर्चर २, वृध्दिमान साहा नाबाद ११, राशिद खान झे. स्टोक्स गो. आर्चर १, बासिल थम्पी नाबाद ०, अवांतर १, एकूण २० षटकांत ७ बाद १५१.
गोलंदाजी ः कृष्णप्पा गौतम ४-०-१८-२, धवल कुलकर्णी २-०-२०-०, जोफ्रा आर्चर ४-०-२६-३, जयदेव उनाडकट ३-०-३३-१, ईश सोधी ३-०-२५-१, बेन स्टोक्स ३-०-२०-०, महिपाल लोमरोर १-०-८-०.
राजस्थान रॉयल्स ः अजिंक्य रहाणे नाबाद ६५, राहुल त्रिपाठी त्रि. गो. संदीप ४, संजू सॅमसन झे. हेल्स गो. कौल ४०, बेन स्टोक्स त्रि. गो. पठाण ०, जोस बटलर झे. धवन गो. राशिद १०, महिपाल लोमरोर झे. साहा गो. कौल ११, कृष्णप्पा गौतम झे. धवन गो. थम्पी ८, जोफ्रा आर्चर नाबाद १, अवांतर १, एकूण २० षटकांत ६ बाद १४०.
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-१५-१, शाकिब अल हसन ४-०-३०-०, बासिल थम्पी २-०-२६-१, सिद्धार्थ कौल ४-०-२३-२, राशिद खान ४-०-३१-१, युसूफ पठाण २-०-१४-१.