पाकिस्तानचा युवा उभरता सलामीवीर हैदर अली याने त्याच्यासाठी टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा आदर्श असल्याचे सांगितले. भारताच्या या धडाकेबाज सलामीवीराच्या फलंदाजीचे अनुकरण करण्याची आपली इच्छा असल्याचे हैदरने काल एका व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले. हैदर हा पाकिस्तानचा उभरता युवा फलंदाज असून त्याची ऑगस्ट-सप्टेंबरमधील इंग्लंडच्या दौर्यासाठी पाकिस्तानी संघात पहिल्यांदाच निवड झालेली आहे. त्याचा २०२०-२१चा मोसम धकाकेदार राहिला होता. जूनमध्ये दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक ३१७ धावा बनविल्या होत्या. तसेच बांगलादेशमधील एसीसी इमर्जिंग टीम्स कप स्पर्धेतही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय करारासाठी विचार करीत त्याला संधी दिलेली आहे.
जर मला माझ्या आदर्श खेळाडू बद्दल विचारले गेले तर मी रोहित शर्माचे नाव घेईन, असे त्याने यावेळी बोलताना सांगितले. तो मला एक खेळाडू म्हणून खरोखर आवडतो. त्याच्यासारखेच सलामीला खेळयला येऊन संघाला आक्रमक सुरुवात करून द्यायची आहे आणि त्याच्यासारखा सफाईदारपणे चेंडूवर प्रहार करायाय. तिन्ही फॉर्मेट्ससाठी तो योग्य फलंदाज आहे. तो आपला खेळ तिन्ही स्वरूपात जुळवून घेऊ शकतो. तो जेव्हा अर्धशतक ओलांडतो तेव्हा शतकाकडे धाव घेतो आणि नंतर तो १५० किंवा द्विशतकाचा विचार करतो ही रोहितची गोष्ट मला आवडते. मलाही तसेच करायचे आहे. मोठ्या धावा करण्याचा विचार करायचाय आणि जेव्हा मी तिथे पोहोचेन त्यानंतरच मोठे लक्ष्य ठेवू शकेन असे सांगितानाच हैदरने रोहित हा एक सामना विजेता खेळाडू असल्याचे म्हटले.