नैऋत्य हैतीत शनिवारी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवल्याने झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.
आधीच कोरोनाशी सामना करत असलेल्या हैतीच्या नागरिकांचे जीवन भूकंपामुळे विस्कळीत झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणाकडून सांगण्यात आले. यामुळे घाबरून नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली. आतापर्यंत या दुर्घटनेत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्क्यामुळे ८६० घरे जमीनदोस्त झाली आहेत. तर ७०० हून अधिक घरांना तडे गेले आहेत.