स्वतःला संत आणि जगद्गुरू म्हणवणार्या रामपालला अखेर त्याच्या सतलोक आश्रमातून हरयाणा पोलिसांनी अटक केली आणि जवळजवळ ३६ तास तेथे चाललेले रणकंदन थांबले. या काळात त्या सार्या परिसराला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि त्या धुमश्चक्रीत किमान पाच – सहा जणांचा बळी गेला. हे सगळे जे घडले ते टाळता आले नसते का असा प्रश्न हे रणकंदन पाहणार्या प्रत्येकाच्या मनामध्ये आल्यावाचून राहिला नसेल. मुळात स्वतःला संत म्हणवणार्या या रामपालने न्यायालयात हजर राहण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ज्या क्लृप्त्या लढवल्या, त्यातून हे प्रकरण गुंतागुंतीचे बनत गेले. २००६ सालच्या एका मृत्यू प्रकरणात त्याला सह-आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहायचे होते. पण गेली चार वर्षे त्याने न्यायालयाने पाठवलेल्या जवळजवळ ४३ समन्सना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने जेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्याला न्यायालयापुढे हजर करण्याचे फर्मान काढले, तेव्हा भक्तगणांची आणि स्वतः बाळगलेल्या सशस्त्र कमांडो दलाची साथ घेत त्याच्या साथीदारांनी न्यायालयीन आदेशाची कार्यवाही पोलिसांना करता येऊ नये याचा पक्का बंदोबस्त केला. पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि गलोलीतून धारदार लोखंडी चकत्या फेकणे काय, दगडफेक काय, ऍसिड असलेली पाकिटे काय, आश्रमाच्या तीस फूट उंचीच्या आणि दोन फूट जाडीच्या भिंतींमागे दडवलेले एलपीजी सिलिंडर काय, एखाद्या युद्धाला तयार व्हावे अशा रीतीने प्रतिकाराची जय्यत तयारी या आश्रमामध्ये केली गेली होती आणि त्याला ती करण्यासाठी उसंत मिळाली ती हरयाणा पोलिसांच्या दिशाहीनतेमुळे. एकीकडे रामपालचे स्त्री – पुरूष भाविक आश्रमाबाहेर शांततापूर्ण निदर्शने करीत होते आणि त्याचवेळी आश्रमाच्या उंच भिंतींआड प्रतिकाराची सर्व प्रकारची जय्यत तयारी सुरू होती. या परिस्थितीचा अंदाज हरयाणा पोलिसांना आलाच नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली, तोवर आश्रमाला जणू युद्धछावणीमध्ये परिवर्तीत करण्यात आले होते. त्याच्या छतावरून पोलिसांवर हल्ले सुरू राहिले. त्यांना पुढे येण्यास अटकाव केला गेला. पोलिसांनी आपला राग या सार्याचे चित्रण करणार्या माध्यम प्रतिनिधींवर काढला. शेवटी आश्रमाच्या कुंपणाच्या भिंती जेसीबीद्वारे पाडून पोलिसांना पुढे सरकावे लागले. त्यानंतर आश्रमात वास्तव्याला असलेल्या जवळजवळ दहा – पंधरा हजार भाविकांना बाहेर पडण्यास रामपालच्या साथीदारांकडून दांडगाईच्या बळावर मनाई करण्यात आली आणि त्यांचा ढाल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी पाच दिवस आत अडकून पडलेल्या काही भाविकांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आश्रमाच्या मागील दारातून बाहेर येण्यात यश मिळवले आणि पोलिसांनी रामपालच्या मुसक्या आवळल्या. तो स्वतःला संत म्हणवत असला, तरी त्याचे तत्त्वज्ञान एकूण हिंदू धर्मतत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. जगाचा उत्पत्तीकर्ता ‘कबीरदेव’ आहे असे त्याचे तत्त्वज्ञान सांगते. तीर्थयात्रा करू नका, देवळात जाऊ नका, देहांतानंतरचे क्रियाकर्म, श्राद्ध करणे निषिद्ध, समाधीपूजन निषिद्ध आहे, असा त्याचा संदेश आहे. त्यामुळे त्याच्यावरील कारवाई हा हिंदू धर्मावरील घाला आहे वगैरे कोणी मानण्याचे काही कारण नाही. बरवालाचा त्याचा बारा एकर जमिनीतला शंभर कोटींचा अवाढव्य आश्रम जमीन रूपांतरण परवान्याविना बांधला गेला होता असे आता स्पष्ट झाले आहे. अशा प्रवृत्ती बळावतात कशा? राजकारण्यांच्या वरदहस्तातूनच ना? एकगठ्ठा मतांसाठी वा स्वतःच्या जातीय भावना कुरवाळण्यासाठी अशांच्या मागे राजकारणी उभे राहतात आणि त्यातूनच अशा प्रकारची साम्राज्ये उभी ठाकतात. स्वतःच्या दैनंदिन जीवनातील समस्यांनी मेटाकुटीला आलेली, नाना प्रश्नांच्या जंजाळात सापडलेली भोळीभाबडी जनता अशांच्या मागे फरफटत जाते. त्यांच्या वक्तृत्वाच्या मोहजालात अडकते आणि आपली सारासार विवेकबुद्धी गमावून बसते. बाबा रामपालने हेच केले आणि जलसिंचन खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर असलेला रामपाल चौदा वर्षांत स्वघोषित ‘जगद्गुरू’ होऊन बसला. आता त्याचा फुगा फुटला. पण असे किती रामपाल देशात असतील?