हे विश्‍वचि माझे घर… ऐसी मती जयाचि स्थिर!

0
297

– विष्णू सूर्या वाघ 

दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातली सर्वात पहिली मोठी परीक्षा. आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावणारी, शाळेबाहेरच्या जगात तुम्ही कुठे आहात हे दाखवून देणारी, त्याचप्रमाणे भावी वाटचालीसाठी तुमच्या वाटेवर यशाच्या पायघड्या घालणारी अशी ही परीक्षा. साहजिकच दहावीच्या परीक्षेचं थोडंसं टेन्शन माझ्या मनावर आलं होतं. माझ्या परीनं माझा अभ्यास चालूच होता. गाईड तर मी वापरत नव्हतोच. पण जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा परिपाठ मात्र चालूच होता.
अन् एवढ्यात हे माझे चार मित्र ती विचित्र विनंती घेऊन आले. डिसेंबर संपून गेला तरी त्यांचा अभ्यास सुरू झाला नव्हता. आता केवळ अडीच-तीन महिने उरले असताना अभ्यास करणं कठीण होतं. या परिस्थितीत माझा स्वतःचा अभ्यास करता करता मी थोडंसं त्यांनाही शिकवावं असं त्यांना वाटत होतं.
मी धर्मसंकटात सापडलो. त्यांना ‘होय’ म्हणावं तर माझ्या अभ्यासाला फटका बसणार याची मला जाणीव होती. ‘नाही’ म्हणावं तर ते चौघेही दहावीला आपटी खाणार हे स्पष्ट दिसत होतं. विचार करण्यासाठी मी दोनतीन दिवस काढले. आपला स्वार्थ की मित्रांचं हित हे दोनच पर्याय होते. मी दुसरा निवडला. म्हटलं, आपला अभ्यास तर काय कसाही होईल, पण आज यांना मदत केली नाही तर हे बुडतील. त्यापेक्षा थोडी अधिक मेहनत करून त्यांचंही ‘कॉन्फीडन्स लेव्हल’ वाढवलं तर बिचारे कमीत कमी पास तरी होऊ शकतील.
आता आम्ही पाचजण मिळून अभ्यास कुठे करणार हा प्रश्‍न होता. कोणाच्याही घरी तशी ऐसपैस जागा नव्हती. शिवाय अभ्यास रात्री करणे आवश्यक होते. मी हेडमास्टर सिल्वासरांना जाऊन भेटलो. म्हणालो, ‘‘सर, एकदोन महिन्यांसाठी मला रात्री शाळेतली एखादी खोली देऊ शकाल? आम्हा पाचजणांना मिळून अभ्यास करायचाय.’’
वाटलं होतं सिल्वासर थोडे आढेवेढे घेतील. पण त्यांनी आनंदानं या प्रस्तावाला संमती दिली आणि त्या दिवसापासून रोज शाळा सुटल्यावर ते मला मुख्य दरवाजाची व शाळेतल्या एका वर्गाच्या कुलपाची चावी देऊ लागले.
मला अजून आठवतं, रात्रीचं जेवण आटोपलं की साडेआठ- नऊ वाजता आम्ही पाच मुलं शाळेत जमायचो. दिवसा गजबजलेली शाळा रात्रीच्या किर्र काळोखात भूतबंगल्याप्रमाणे वाटायची. त्या एवढ्या प्रचंड वास्तूत फक्त आम्ही पाचजण, ही कल्पनाच थरकाप उडवणारी होती. शिवाय त्या इमारतीत भुतांचा वावर असतो अशीही आवई कुणीतरी उठवून दिली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला कुत्रे भुंकू लागले की रस्त्यावरनं देवचार फिरायला चाललाय, त्याच्या वाटेत आडवे जाऊ नका, शाळेतच गप्प बसा असे वडीलधार्‍यांनी आधीच दटावून ठेवले होते. अशा परिस्थितीत आमच्या अभ्यासाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मी गणित व विज्ञान या विषयांवर भर दिला. मग हळूहळू बाकीचे विषय शिकवायला घेतले. नऊ वाजता सुरू होणारा अभ्यास अडीच-तीन वाजेपर्यंत चालायचा. कधी रात्री बारा वाजता झोपून आम्ही तीन वाजता उठायचो. शाळेपासून जरा अंतरावर एक पावाची बेकरी होती. अडीचच्या सुमाराला तिथे गरमागरम पाव मिळायचे. आम्ही चालत जाऊन बेकरीतून ते पाव आणायचो आणि मनमुराद त्यांचा आस्वाद घ्यायचो. पहाटे सहा वाजले की आपापल्या घरी पळायचो. मग पुन्हा न्हाऊन-धुवून शाळेत!
असे दोन महिने गेले. माझ्या वर्गमित्रांना आता थोडा धीर आल्यासारखे वाटत होते. त्यांचा बर्‍यापैकी अभ्यास झाला होता. परीक्षेला दहाएक दिवस असताना मी या शिकवण्या बंद केल्या व त्यांना सांगितले, ‘आता तुमचा अभ्यास तुम्ही करा. ऑल द बेस्ट!’
परीक्षा झाली. निकालाचा दिवस जवळ येऊ लागला. मला काही पास होण्याची फिकीर नव्हती. काही झालं तरी आपला फर्स्ट क्लास काही चुकणार नाही याची पूर्ण खात्री होती. धास्ती वाटत होती ती फक्त मित्रांची. ते नापास झाले तर त्यांच्यापेक्षा माझी बदनामी होण्याचा धोका अधिक होता. त्यांचा अभ्यास मी घेतोय याबाबतचा गवगवा गावभर झाला होता.
निकालाच्या दोनतीन दिवस आधी मला पहाटे एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात काय दिसावं? तर मी बोर्डाच्या मॅरिट लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आलोय. सर्वत्र माझं अभिनंदन होतंय. लोक गळ्यात हार घालतात… वगैरे वगैरे.
निकालाच्या दिवशी वडील पहाटेच उठून पेपर आणायला तिठ्यावर गेले. परतले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. ‘बोर्डात रँक आलाय!’ ते म्हणाले.
मी विचारलं, ‘कितवा?’
ते म्हणाले, ‘आठवा!’
मी आनंदाने उड्याच मारायला लागलो. आठवा तर आठवा! बोर्डात रँक तर आहे अन् तोही वीस-पंचवीस नव्हे तर तब्बल हजारो मुलांमधून.
शेवटी मला पडलेलं ते स्वप्न खरं झालं होतं. फरक एवढाच की पाचव्याऐवजी आठवा क्रमांक मिळाला होता. पण नंतर त्याचाही उलगडा झाला. पेपरमध्ये जी गुणवत्ता यादी होती त्या यादीत पाचव्या क्रमांकावर पाचजणांना समान गुण मिळाले होते. माझं आडनाव ‘डब्ल्यू’पासून सुरू होत असल्यामुळे त्या यादीत मी चौथा होतो व ‘एक्स’पासून आडनावाची सुरुवात असलेला एक मुलगा नवव्या क्रमांकावर होता. म्हणजेच पाचव्या क्रमांकावर समान गुण मिळवून आम्ही पाचजण आलो होतो!
दुसरी एक चांगली बातमी नंतर कळली. माझ्यासोबत रात्री शाळेत अभ्यास करणारे चौघेही मित्र किमान ४०-४५ टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाले होते!
मॅरिट लिस्टमध्ये झळकल्यामुळे माझं सर्वत्र कौतुक झालं. सत्कारबित्कार झाले. वर्तमानपत्रांत बातम्या आल्या. माझ्या यशाचा आनंद तर मला होताच, पण नापास होण्याची खात्री असलेले माझे चार मित्र परीक्षेच्या वादळातून सहीसलामत तरले याचं समाधान अधिक होतं. दुसर्‍या एका वर्गमित्राने बोलता बोलता मला टोमणाही मारला होता- ‘‘यांना सुधारण्याच्या नादी लागला नसतास तर कदाचित पहिलासुद्धा आला असतास! फक्त नऊ मार्कांचा तर फरक होता!’’
कदाचित तो खरंही बोलत असावा. पण मला त्याची टिप्पणी विशेष महत्त्वाची वाटली नाही. समर्थ रामदासांच्या दासबोधात वाचलेली एक ओळ मला त्याक्षणी राहून राहून आठवत होती- ‘जे जे आपणांसि ठावे| ते ते इतरांसि सांगावे| शाहाणे करून सोडावे| सकळ जन॥
व्यक्तिगत यशाचा आनंद आपल्यापुरता असतो. पण हे यश सामूहिक असेल तर त्या आनंदाची व्याप्ती शतपटीने वाढते. जगात होऊन गेलेले संत, ज्ञानी, विद्वान केवळ स्वतःपुरते कधीच जगले नाहीत. ते विश्‍वासाठी जगले. ‘हे विश्‍वचि माझे घर| ऐसी मती जयाचि स्थिर| किंबहुना चराचर| आपणचि जाहला॥ ही ज्ञानेश्‍वरांची अनुभूती आहे. ही अनुभूती एकाएकी येऊ शकत नाही. त्यासाठी ‘मी’पणाचा, ईर्ष्येचा त्याग करावा लागतो. ‘स्व’चा कोश फाडून बाहेर यावं लागतं. जात-पात-पंथ-धर्म-देश-कालाच्या पलीकडे जावं लागतं. या सर्वांच्या अतीत होऊन विचार केला तरच सृष्टीशी आपणाला नातं सांगता येईल.
आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे. जीवन जगताना प्रत्येक पायरीवर आपण कुणा ना कुणाशी स्पर्धा करत असतो. यातून ईर्ष्या निर्माण होते. ती एवढ्या थराला जाते की आपणच कारण नसताना आपले स्पर्धक ठरवू लागतो.
काल ‘व्हॉटस्‌ऍॅप’वर एका मित्रानं एक सुंदर अनुभव पोस्ट केला. तो त्याच्याच शब्दांत सांगणं इष्ट ठरेल-
‘परवा सकाळची गोष्ट. मी गावच्या रस्त्यावरून सायकलवरून जात होतो. लांब सरळसोट रस्ता. पुढं नजर टाकली तर किलोमीटरभर अंतर दृष्टिक्षेपात यावं इतका सरळ. सायकल चालवता चालवता मी समोर पाहिलं तर चारशेक मीटर अंतरावर एक सायकलवाला पुढं जाताना दिसला. अचानक मला त्याच्याशी स्पर्धा करण्याची हुक्की आली. मी पॅडल मारीत सायकलला वेग दिला व पुढे निघालो. तो आपल्याच नादात सायकल चालवीत होता. पण मध्येच तोही जोरात पॅडल मारून पुढं जायचा. अर्थात मी त्याच्याशी रेस करतोय हे त्याच्या गावीही नव्हतं.
पाच-दहा मिनिटे गेली तरी त्याला मागे टाकता येईना हे पाहून मी बावचळलो. इरेला पेटलो. त्याला मागे टाकणे हे आता माझे एकमेव ध्येय बनले. या एकांगी रेसची त्या बिचार्‍याला मात्र काहीच कल्पना नव्हती. इरेला पेटलो होतो केवळ मी. दात-ओठ चावत, धापा टाकत, पॅडल फास्ट करीत मी सायकल पुढं रेमटवली आणि पुढे अजून एक किलोमीटरपर्यंत त्याला मागं टाकून सायकल चालवीत राहिलो. अधूनमधून मी मागं वळून पाहायचो तर तो आपल्याच नादात सायकल चालवत येत होता. आपणाला मागं टाकून कोणीतरी पुढं गेलाय हे त्याच्या खिजगणतीतही नव्हतं. मी पुढं गेल्याचं त्याला काहीएक पडलेलं नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मीच ओशाळलो. म्हटलं, हे काय करतो आहोत आपण? कोणाशी रेस लावतो आहोत? आणि आपणाशी रेस लावली जाते हे ज्याला माहीतही नाही त्याला हरवण्यात कसला आलाय आनंद?
मी थांबलो. तो आपल्याच नादात पुढं निघून गेला. मग माझ्या लक्षात आलं की मी पोस्ट ऑफिसला जायला निघालो होतो, पण या रेसच्या नादात पोस्ट ऑफिस कधीच मागं पडलं होतं. झक् मारत मला वळसा घालून परत यावं लागलं.’
जीवनात असंच होतं. आपण कारण नसताना इतरांशी स्पर्धा करायला लागतो. ऑफिसमधल्या सहकार्‍यांशी, शेजार्‍यांशी, मित्रांशी, नातेवाईकांशी एकसारखी आपली स्पर्धा चालू असते. मित्राने ‘स्विफ्ट’ घेतली तर आपल्याला ‘डस्टर’ घ्यावीशी वाटते. शेजारणीने १६ हजार रुपयांची पैठणी घेतली तर आपल्याला २५ हजारांची पैठणी हवीशी वाटते. शेजार्‍याच्या मुलांनी बर्गर खाल्ला तर आपल्या मुलांना पिझ्झा खावासा वाटतो. का होतं असं? कारण आपल्या अंतर्मनात आपल्याला असं वाटत असतं की जे माझ्याकडे आहे ते इतरांपेक्षा चांगलं असलं पाहिजे. अशा वृत्तीतून लावलेली स्पर्धा निकोप नसते. ती स्वार्थाला आमंत्रण देते. या स्पर्धेच्या मोहात पडणे म्हणजे एका दुष्टचक्रात अडकणे. त्यातून मग सुटका नाही. गरगरगर दुष्टचक्रात फिरत राहाणे हेच भागधेय.
लक्षात ठेवा, आयुष्याच्या रस्त्यावर कुठेही एखादं ठिकाण असं नसेल की जिथं तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढं असाल. कुणी ना कुणी तुमच्या अगोदर असेलच. तुमच्याकडे आहे त्यापेक्षा अधिक चांगलं त्याच्याकडे असू शकेल. ऐसपैस घर, देखणी बायको, आलिशान कार, भरपूर नोकरचाकर, लठ्ठ बँक बॅलन्स… या सर्व बाबतीत तुमच्यापेक्षा तो अधिक नशीबवान असू शकेल. पण मग त्याचा द्वेष का करायचा? जे त्याच्या प्राक्तनात होतं तेवढं त्याला मिळालं. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हालाही मिळेल. नशिबानं दिलंय त्याचा हसर्‍या चेहर्‍यानं स्वीकार करा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. रंगरूपाची, अंगलटीची तुलना इतरांशी करू नका. तुम्हाला शोभेल असा पेहराव करा. तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून उठेल असे कपडे घाला. रेस खेळायचीच पण दुसर्‍याशी अथवा नियतीशी नको. आपली रेस आपणापुरती या वृत्तीनं खेळा!
काळ बदलतो तसे संदर्भ बदलतात. आजची नवी कहाणी उद्या जुनी बनते. काही वेळा जुनी गोष्ट नव्या रूपात येऊन जाते. अशीच एक कथा आहे ससा आणि कासवाची.
लहानपणी पाठ्यपुस्तकात एक गोष्ट होती. एक होतं कासव आणि एक होता ससा. दोघेही एकमेकांची शर्यत लावतात. ससा लांब लांब उड्या मारीत पुढं जातो. कासव हळूहळू हलतडुलत येत असतं. हे बघून ससा निर्धास्त होतो आणि एक छान डुलकी काढण्याच्या निमित्तानं धरणीला पाठ टेकवतो. तिथंच त्याला गाढ झोप लागते. कासव बिचारं मागनं येतं, सशाला झोपलेलं पाहातं आणि गुपचूप आपल्या लयीत चालत चालत मुक्कामाला पोचतं. ससा झोपून राहतो. जाग येते तेव्हा त्याला कळतं की कासवानं शर्यत जिंकून चँपियनशीपपण पटकावलीय.
पुस्तकात ही कथा होतीच, पण रेडिओवरूनदेखील ‘ससा तो कसा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली की वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली’ या गाण्यातून ही गोष्ट कानावर पडायची आणि सशाच्या मूर्खपणाला आम्ही हसायचो. ‘स्लो अँड स्टेडी विन्स द रेस’ ही इंग्रजी म्हणही याच गोष्टीवरून रूढ झाली होती.
आता मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या क्लासमध्ये हीच गोष्ट नव्या पद्धतीनं सांगितली जाते. नव्या पद्धतीनं म्हणजे ‘जुन्या कथेचं नवीन एक्स्टेन्शन’ या अर्थानं. ससा आणि कासवाची ती पहिली शर्यत लागून काही महिने उलटून गेले आहेत. कासव ती गोष्ट विसरूनही गेलंय. पण रेस लावता लावता आपण वाटेतच झोपलो आणि कासव पुढं गेलं या पराभवाचं शल्य सशाच्या काळजाला अजून बोचतंय. त्या पराभवाचा वचपा काही करून काढायलाच पाहिजे असं ठरवूनच बसलाय ससा. मग तो काय करतो, कासवाला एक दिवस जेवायला बोलावतो व पुन्हा एकदा रेस लावायचा विचार बोलून दाखवतो. नाही म्हटलं तरी कासवाच्या डोक्यात पहिल्या विजयाची झिंग असतेच. ते तत्काळ होकार देतं. ठरल्याप्रमाणं रेस लागते. पण सशानं रेसचा मार्ग आखलेला असतो तो खाचखळग्यांनी भरलेल्या डोंगरवाटेवरून. या मार्गावरून चालता चालता कासवाची दमछाक होते. ससा मात्र टणाटण उड्या मारीत जातो. वाटेत कुठेच अजिबात झोपायचं नाही हे त्याने आधीच ठरवलेलं असतं. त्याप्रमाणं तो अजिबात चुकारपणा न करता वेळेआधीच ठरल्या ठिकाणी पोचतो व विजयी होतो.
आता लज्जित होण्याची पाळी कासवाची असते. कासव म्हणतं, सशाला धडा शिकवायलाच हवा. ते सशाला जेवणाला बोलावतं व त्याला उचकवतं की आपण पुन्हा एकदा रेस लावू. पण यावेळी मार्ग कुठला ते मी ठरवणार. ससा पटकन होकार देतो. कासव असा मार्ग निवडतं की ज्या मार्गाला पाच-सहा नद्या आडव्या जाताहेत. इथे सशाची अडचण होते. तो जमिनीवरून धावतो, पण वाटेत नदी आडवी आली की त्याची अडचण होते. पहिली नदी तो कशीबशी पोहून जातो, पण त्याला एवढी भीती वाटते की तो दुसर्‍या नदीत उडीच टाकत नाही. कासव मात्र आरामात एक एक नदी पोहून जातं आणि व्यवस्थित शर्यत जिंकतं.
मग एक दिवस ते दोघे जेवायला बसले असताना खूप चर्चा करतात. ससा म्हणतो, ही अशी एकमेकांशी रेस लावून कोणाचं भलं होणार? त्यापेक्षा आपण असं काहीतरी करू की ज्यात दोघांचंही भलं होईल.
मग ते दोघं एक वेगळी शर्यत खेळतात. कासव एक पाट आणतो व त्या पाटाला एक दोरी बांधतो. पाटाला खाली चाकं लावलेली असतात. दोरीचं टोक ससा तोंडात घेतो. कासव पाटावर बसतं. ससा दोरी दातांखाली धरून पुढं धावू लागतो व चाकं लावलेला पाट वर बसलेल्या कासवासकट त्याच्या मागं येतो. वाटेत नदी येते. मग ससा थांबतो व पाटावर बसतो. दोरीचं टोक कासव तोंडात घेतं व पोहत पोहत पाण्यावर तरंगणारा पाट (व त्यावरचा ससा) घेऊन पैलतीरी येतं. जमिनीवर पोचले की पुन्हा ससा पुढे व कासव पाटावर, पाणी लागलं की कासव पुढे व ससा पाटावर असं करत करत दोघेही एकाच वेळी इच्छित स्थळी पोचतात.
काय शिकणार आहोत आपण या कहाणीतून?
(क्रमशः)