हे मना…!

0
243

– प्रेमानंद मस्णो नाईक
विचारांच्या जंजाळातून थोडं बाहेर येऊन मनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मन कुठे जाग्यावर असते? ते बिचारे विचारांच्या मागे मागे धावत सुटलं आहे. हे असंच असतं का? आपण विचार एक करतो; पण मन मात्र आपल्याला इतर विचारांकडे ओढून नेत असते. कधी कधी मनातील विचार आपण प्रकट करण्याचा अट्टाहासाने प्रयत्न करत असतो. पण एकूण त्यावेळची स्थिती पाहून पाहून अनेक वेळा मन मारून वागत असतो. काही काही वेळा तर मनातील विचार इतरांना सांगण्यासाठी आपण आतुर झालेलो असतो. परंतु एकेकदा मन काही तयार होत नाही. काय आहे हे मन? असा प्रश्‍न तुम्हा आम्हा प्रमाणे संतश्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनाही पडला होता. म्हणून त्या म्हणतात –
देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात
असा कसा रे यवगी
काय तुझी करामत
आपलं मन हे एका जाग्यावर राहूच शकत नाही. ते सतत फिरत असतं एका जाग्यावरून दुसर्‍या जाग्यावर; एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणावर. अशीच ह्या मनाची करामत आहे. अशा ह्या मनाच्या चंचलपणाने अनेकांचे मात्र जीवाचे हाल होत असतात. मनाची व्याप्ती मोठी असते. मनात आपण अनेक गोष्टी साठवून ठेवत असतो. म्हणून म्हणतात ना –
मना मनातील भाव असे
जाणले कुणी चिंतले कसे…
मनातील भाव जाणण्यासाठी आधी आपल्यापेक्षा इतरांची मने जिंकण्याची कला आपल्याला जमली पाहिजे तरच आपण इतरांची मने जिंकू शकाल. पण तुमच्या प्रमाणे मी पण म्हणतो की आपलंच मन आपल्या ताब्यात नसताना आपण दुसर्‍याचे मन कसे ओळखायचे? हाच तर सर्वांसमोर मोठा प्रश्‍न असतो.
माणसाचं आपलं एक चांगलं असतं. त्याच्या सर्व गोष्टी या मनावरच अवलंबून असतात. जर मन आनंदी तर मानवाच्या सर्व गोष्टी आनंदी. सर्व गोष्टीच नाही, सगळं जगच आनंदी वाटायला लागतं. मग कोसळणारा पाऊस पाहून –
श्रावणात कोसळती सरीवर सरी
मन धुंद – बेधुंद त्या नृत्यावरी…
अशा ओळी आपोआप कागदावर उतरू लागतात. अशी ह्या मनाची करामत असते. असं म्हणतात की मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपण मनाला अशा चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे. सकारात्मक विचार हाही त्याचाच भाग आहे. पण कधी कधी मन काही कारणास्तव उदास बनते. मग या मनाला कितीही रिझवण्याचा प्रयत्न केला तरीही मन काही थार्‍यावर येत नाही. तसं पाहिलं तर सकाळी अन् संध्याकाळी आभाळात मन प्रसन्न करणारी ‘गुलाबी’ दिसत असते; परंतु मनच जर उदास असेल तर हेच संध्याकाळचे चित्र पाहून कवी मन म्हणते –
उदास सांज अबोल शब्द
ओल्या पापण्या ओल्या पापण्या
मन उदास असेल तर त्याचा निश्‍चित परिणाम आपल्या चेहर्‍यावर जाणवत असतो अन् न सांगताही काही गोष्टी ज्या आहेत त्या इतरांना कळून चुकतात अशी या मनाची महती आहे. मनाची महती सांगताना संतश्रेष्ठ बहिणाबाई म्हणतात –
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायातबी मायेना
मनाची स्थितीच अशी असते की कधी कधी मन सर्वांना बरोबर घेऊन जात असतं तर कधी कधी ते एवढं कठोर बनतं की –
मन कठोर कठोर
किती दगडी पाषाण
नाही पाझर पाझर
एवढं कठोर मन?
असे हे मन कधी कठोर तर एवढं कोमल बनतं की या मनाच्या आधारावरच अनेकांची मने आपण जिंकू शकतो. मनाला चांगल्या विचारांच्या मागे लावण्यासाठी आपण सतत चांगल्याचा ध्यास घेतला तर मग मन कधी कधी दु:खी असतानासुद्धा आपण इतरांना आपण प्रसन्न आहोत याची जाणीव करून देऊ शकतो. मनाची महती मनच जाणे!