हेल्मेट, घड्याळ वाचवणार वीज कर्मचाऱ्यांचे जीव

0
5

>> वीजमंत्री; गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहकार्य

वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचे अपघात रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणारा आहे. वीज धक्यापासून बचावासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हेल्मेट व घड्याळामार्फत जिवंत वीजवाहिनीची माहिती मिळणार आहे. त्यासाठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत घेण्यात येत असल्याने अपघात नियंत्रणात येणार असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.

फोंडा येथे वीज खात्याच्या कर्मचारी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात वीजमंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्ना उत्तगी, ॲड. सुहास नाईक, कार्यकारी अभियंता सुदन कुंकळयेकर, केतन भाटीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. वीज खात्यात गेल्या दोन वर्षात साडेतीन हजार कोटी रुपयांची विकासकामे करून ग्राहकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतर राज्यांपेक्षा गोव्यातील ग्राहकांना वीज स्वस्त दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. एखादा कर्मचारी वाईट मार्गाने गेल्यास त्याची समजूत काढून त्याला चांगल्या मार्गाने वाळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
राजकीय लोक सरकारी खात्यात हस्तक्षेप करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच वीज चोरी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक असल्याचे कामगार नेते फोन्सेका यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांहस्ते कामगार प्रतिनिधीचा खास सत्कार करण्यात आला.