हेमांग अमिन यांची बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर हंगामी स्वरुपाची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. २०१७ सालापासून आयपीएलचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या अमिन यांच्या नियुक्तीची घोषणा काल मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली.
२००९ व २०१४ या निवडणुक वर्षांत झालेल्या आयपीएल स्पर्धा पूर्ण किंवा काही प्रमाणात अन्यत्र हलवाव्या लागलेल्या असताना मागील वर्षी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत आयपीएल स्पर्धा कोणत्याही अडथळ्याविना घेण्याचे श्रेय अमिन यांना जाते. नागपूरस्थित अमिन हे आपल्या मेहनती स्वभावासाठी ओळखले जातात.
१७ जुलै रोजी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यात नवीन सीईओ नेमणुकीचा मुद्दा चर्चेसाठी येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सीईओ पदासाठी बीसीसीआय जाहिरात काढण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सीईओपदासाठी पात्र ठरण्यासाठी व्यक्तीने १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीसोबत सीईओपदावर काम करणे आवश्यक आहे. ‘सीईओ’पदाच्या शर्यतीत उतरणार्यांची नावे उघड होण्याची शक्यता लक्षात घेता मोठया कंपनींसोबत सध्या कार्यरत असलेले ‘सीईओ’ यात रस दाखवण्याची शक्यता खूप कमी आहे.