हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

0
4

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून काल मोठा दिलासा मिळाला. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या 5 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या सोरेन यांची शुक्रवारी जामिनावर सुटका झाली. सायंकाळी 4 वाजता ते बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले. सोरेन तुरुंगातून बाहेर येताच मोठ्या संख्येने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. पतीला तुरुंगातून बाहेर पाहून पत्नी कल्पना सोरेन यांना आनंदाश्रू तरळले.
या प्रकरणाची सुनावणी 13 जून रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण होते. हेमंत सोरेन यांच्यावर 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची 8.86 एकर जमीन बेकायदेशीरपणे संपादित केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीने आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली. या आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर हेमंत सोरेन यांना अटक केली. 31 जानेवारीपासून ते कोठडीत होते.