अधिकाऱ्यांना सरकारचा आदेश
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी प्रसारित होणारा ‘हॅलो गोंयकार’ हा दूरदर्शनवरील थेट कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांनी पाहावा, असा आदेश सरकारकडून काढण्यात आला आहे. या कार्यक्रमात नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे हॅलो गोंयकार या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढील निर्देश देत असतात. सरकारच्या विविध खात्यांचे प्रमुख, स्वायत्त संस्थांच्या प्रमुखांनी हा कार्यक्रम पाहून नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणारे प्रश्न, समस्यांची स्वेच्छा दखल घेऊन सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेऊन त्यासंबंधीचा कृती अहवाल 15 दिवसांत सादर करावा. तसेच, त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि सार्वजनिक तक्रार विभागाला द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.