हॅरिस कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक

0
115

संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबरपासून रंगणार्‍या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज रायन हॅरिस याची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स होप्स यंदाच्या हंगामात खासगी कारणामुळे सहभागी होणार नाही. त्याच्या जागेवर दिल्ली संघ व्यवस्थापनाने रायन हॅरिसची नियुक्ती केली आहे. आयपीएलमध्ये एका प्रकारे मी पुनरागमन करतोय, याचा मला आनंद आहे.

दिल्लीसारखा संघ जो स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातो त्या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करायला मला नक्की आवडेल. दिल्लीच्या संघात खूप चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत सराव करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया हॅरिसने दिल्लीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर दिली आहे. ४० वर्षीय हॅरिसच्या समावेशामुळे कॅपिटल्सच्या प्रशिक्षण पथकात अजून एका दिग्गजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्‍वविक्रमी कर्णधार रिकी पॉंटिंग हा कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. साहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य मोहम्मद कैफ जबाबदारी सांभाळत आहे. स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून एकेकाळचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट गोलंदाज सॅम्युअल बद्री गोलंदाजांना मार्गदर्शन करेल.

दिल्ली संघात इशांत शर्मा, कगिसो रबाडा, ऍन्रिक नॉर्के सारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले जलदगती तर कीमो पॉल, मार्कुस स्टोईनिस व मोहित शर्मासारखे मध्यमगती गोलंदाज आहेत. त्यांच्या जोडीला हर्षल पटेल, अवेश खान व तुषार देशपांडे हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेले खेळाडूदेखील आहेत. रायन हॅरिसला असलेला अनुभव या सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकतो.