आणखी एक वर्ष सरले. २०१४ परिवर्तनाचा गाजावाजा करीत आले होते आणि आता सरताना तीच अपेक्षा मागे ठेवून गेले आहे. भारतीयांच्या अपेक्षा, आकांक्षा उंचावलेल्या आहेत आणि येणारे नवे वर्ष त्यांच्या पूर्ततेचे असेल अशी आशा एकशे वीस कोटी भारतीयांच्या मनामध्ये आज तेवते आहे. सरत्या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे कडू – गोड घटना घडल्या. पण देशाला अभिमानास्पद अशा घटनांचे पारडे वर राहिले. मंगळावरच्या मोहिमेने भारताच्या वैज्ञानिक कर्तृत्वाची ध्वजा जशी दिमाखाने फडकली, तसे कैलाश सत्यार्थींना मिळालेले नोबेल देशाची मान उंचावून गेले. अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांची ‘भारतरत्न’ साठी झालेली निवड सार्वजनिक जीवनातील शुचितेला सन्मानित करून गेली. वर्षभर नरेंद्र मोदी नावाचा झंझावात देशामध्ये वादळे आणि वावटळी उमटवीत राहिला. सुस्तावलेल्या नोकरशाहीला त्याने हलवण्याची धडपड केली, सरकारी कार्यालयांमधला कचरा एका झटक्यानिशी बाहेर काढला आणि ‘स्वच्छ भारता’चा संकल्प जनतेलाही करायला लावला. ‘मेक इन इंडिया’ च्या दिशेने त्याची आता पावले पडू लागली आहेत, पण त्यातून भांडवलदारांचेच हित साधले जाणार आहे का, शेतकर्यांच्या पोटावर पाय ठेवला जाणार आहे का असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, ज्यांची उत्तरे अद्याप मिळायची आहेत. परंतु नानाविध भ्रष्टाचार, घोटाळ्यांच्या मालिकेला बर्यापैकी पायबंद बसला आहे हे दिलासादायक आहे. पण एकीकडे विकास आणि सुशासनाकडे अशी प्रयत्नपूर्वक पावले टाकली जात असताना प्रतिगामी शक्ती धर्मपरिवर्तनासारख्या भलत्या विषयांना पुढे करून हे पाय मागे ओढण्यामागे लागल्या आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटायला झुंडीने निघाल्या आहेत. धर्माच्या नावे मने दुभंगायला निघाल्या आहेत. त्यामुळे कोणते चेहरे खरे आणि कोणते मुखवटे हे ओळखणे दुरापास्त झाले आहे. गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेल्या श्री. मनोहर पर्रीकरांचे केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जाणे समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद ठरले. त्यांच्या कार्यक्षमतेचा कस अद्याप दिल्लीत लागायचा असला तरी त्याची चुणूक दिसू लागली आहे. कटू घटनांचीही सरत्या वर्षात काही कमी नव्हती. पाकिस्तानकडून सीमेवर झालेला गोळीबार, दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवानांचे गेलेले प्राण, बॉम्बस्फोटांचे न थांबलेले सत्र, मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांची पाकिस्तानकडून सुरूच राहिलेली पाठराखण आणि भारताची त्याबद्दलची हतबलता. खुद्द पाकिस्तानात निष्पाप मुलांची तालिबान्यांनी केलेली कत्तल या सगळ्या घटनांचे ओरखडे भारतीयांच्या मनावरही उमटले आहेत. गोपीनाथ मुंडेंसारख्या उमद्या नेत्याचे अपघाती निधन, माळीणसारखे गावच्या गाव दरडीखाली गडप होणे, बियास नदीतून कोवळ्या २४ मुलांचे वाहून जाणे, भूनंदनवन काश्मीरची, विशेषतः श्रीनगरची पुराने केलेली वाताहत, अनेक अपघात, अनेक दुर्घटना यांची जंत्री सरत्या वर्षासंदर्भातही आठवणीत राहील. गायब झालेली मलेशियाची फ्लाईट ३७०, असो नाही तर भर समुद्रात पेटलेली ग्रीसची फेरी असो, नव्या वर्षातही अशा कटू घटना वाढून ठेवलेल्या नसतील असे नव्हे. गेल्या वर्षाची सुरूवात काणकोणच्या इमारत दुर्घटनेत तीस कामगारांचा बळी घेऊन झाली होती. निदान येणार्या वर्षाची सुरूवात गोड व्हावी, वर्ष सरताना समाधानाची सयच त्यावर राहो अशी आशा करूया. सरत्या वर्षात देशाने ‘ऑनलाइन’ विश्वाकडे झेप घेतलेली दिसून आली. फ्लीपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडीलसारख्यांमुळे ई – कॉमर्सची धमाल वर्षभर सुरू होती. मोदी सरकारनेही सरकारी उपक्रमांना जनतेशी ऑनलाइन जोडण्यास सुरूवात केलेली आहे. तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून देश पुढे निघाल्याचे हे चित्र आश्वासक आहे. मात्र, हा वरवरचा बुडबुडा ठरणार नाही अशी अपेक्षा आहे. तळागाळातील माणसांच्या मनाच्या सांदिकोपर्यांतले दुःख अजून तसेच आहे. त्यांच्या व्यथा – वेदना त्याच आहेत. ‘अच्छे दिन’ अजून तरी फार दूरचे दिवे आहेत. या नववर्षामध्ये या अंधार्या कोपर्यांमध्येही दीपज्योती उजळाव्यात, त्यांनी तेथला अंधार हटवावा आणि प्रकाशाची बीजे पेरावीत असे मागणे मागूया. हे नवे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखसमृद्धीचे, आनंदाचे, यशाचे आणि भरभराटीचे आणि अतीव समाधानाचे जावो या मनःपूर्वक शुभेच्छा!