हृदय सांभाळा

0
20
  • डॉ. मनाली पवार

आज उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या तीन व्याधी गरीब-श्रीमंतांत, गावा-शहरांत, सुशिक्षित-अशिक्षितांत, तरुण-वृद्धांमध्ये पसरत आहेत. स्वतःला या व्याधींपासून दूर ठेवायचे असल्यास सगळ्यात महत्त्वाचे आहे ते हृदयाचे आरोग्य. त्यामुळे हृदयशरीर प्रत्येकाला जपता आले पाहिजे.

आयुर्वेदशास्त्रात ‘शिरोहृदयबस्त्यादि’ या तीन मर्मस्थानांची विशेष काळजी घ्यायला सांगितले आहे. आणि आज उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या तीन व्याधी गरीब-श्रीमंतांत, गावा-शहरांत, सुशिक्षित-अशिक्षितांत, तरुण-वृद्धांमध्ये पसरत आहेत. स्वतःला या व्याधींपासून दूर ठेवायचे असल्यास सगळ्यात महत्त्वाचे आहे ते हृदयाचे आरोग्य. त्यामुळे हृदयशरीर प्रत्येकाला जपता आले पाहिजे.

जन्माला आल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके आपल्याही नकळत अखंडपणे चालू असतात. अशुद्ध रक्त घेऊन ते शुद्ध करून संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण अखंडपणे चालू ठेवणे हे काम अविरत चालू असते. आज लहानसहान श्रमाने, दोन-तीन जिने चढण्याने, थोडेसे चिढल्याने, मानसिक दडपणाने लगेच जीव वर-खाली होतो. धाप लागते. म्हणून हृदयाचे आरोग्य चांगले असणे खूप आवश्यक आहे.

हृदयाचे कार्य मेंदू आणि मूत्रपिंड यांच्या सहकार्यामुळे अखंड चालू असते. त्याचबरोबर हृदयासोबत फुफ्फुसाचे आरोग्यही उत्तम हवे. हृदयाचे प्रमुख कार्य रक्ताभिसरण. त्यामुळे रक्ताचे व चरबीचे प्रमाण, नाडीचे ठोके, रक्तशर्करा, पुरेशी झोप, आसपासचे वातावरण, दिवसभराची धावपळ, ताणतणाव, व्यायाम, व्यसने या घटकांवरही लक्ष हवे.
हृदयाचे शरीर हे स्नायूंनी बनलेले असते. ते ठणठणीत असले तरच आजच्या धावपळीला, श्रमांना, ताणतणावांना, हवामान वा खाण्या-पिण्याच्या बदलांना तोंड देईल व टिकून राहील. हृदयाच्या या चार कप्प्यांची बांधणी लवचीक स्नायूंची असल्यामुळे विविध कप्प्यांतील अशुद्ध/शुद्ध रक्ताचे अभिसरण अखंड चालते. या कप्प्यांत, हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यांत व हृदयाकडून दुसरीकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत कदापि चरबी साठू नये. ज्या प्रमाणे नदी-नाल्यांत गाळ साचल्यास पाण्याचा प्रवाह मंदावतो, खंडित होतो; त्याचप्रमाणे हृदयाचे कार्य फाजिल चरबी वाढल्याने नीट होत नाही. म्हणून रक्तातील चरबी वेळोवेळी तपासून घ्यावी. शरीराचे वजन, कॉलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड ठरावीक प्रमाणाच्या बाहेर वाढले असल्यास तत्काळ आहार, खाणे-पिणे, दुपारची झोप याबद्दलचे नियम पाळावेत. जेवणात कटाक्षाने उकडलेल्या भाज्या, ज्वारीची भाकरी, मीठ कमी, तसेच तेलकट, मांसाहार, बेकरी प्रॉडक्टस्‌‍, मिठाई पूर्ण वर्ज्य करावी. घाम निघेल असे गरम पाणी प्यावे.

हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य टिकण्यासाठी हृदयावर कार्य करणारे अर्जुन हे अग्रद्रव्य आहे. वैद्याच्या सल्ल्याने अर्जुनाच्या सालीचा काढा, चूर्ण घ्यावे. पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीच्या पानांची चटणी ही आहारीय द्रव्ये वापरावीत. दीर्घश्वसन, प्राणायाम करावे.

हृदय व मूत्रपिंड
मूत्रपिंडामध्ये सहज भरपूर लघवी निर्माण करण्याची क्रिया अखंडपणे चालू असते. या प्रक्रियेत विक्षेप आला की नंतर लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. हृदय जोरात काम करू लागले, धाप लागते. अशावेळी सुवर्ण व चांदीसारखी औषधे हृद्रोगी माणसांना मदत करतात. गोक्षुरादि गुग्गुळं, चंदनादि वटी, रसायन चूर्ण इत्यादी वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे. कटाक्षाने मीठ टाळावे, लोणचे, पापड, शिळे अन्न पूर्ण वर्ज्य करावे.

हृदयरोग आणि मधुमेह
साधारण वीस वर्षांपूर्वी भारतात मधुमेही रुग्णांचे प्रमाण 15 टक्क्यांच्या आसपास होते. आता त्यात भयावह वाढ झाली आहे. जीवनशैली वेगवान झाली. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाला. सणासुदीचे गोडधोड नेहमीच्या ताटात आले. बेकरी पदार्थांची तर रेलचेलच वाढली. तरुणवर्ग रात्रपाळी नित्य करू लागला. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले व मधुमेहाने ग्रस्त होऊ लागले. हृद्रोग्याला मधुमेह विकाराची जोड असल्यास अर्धांगवात, मेंदूचे आजार, हार्ट ॲटॅक हे रोग जवळपास घुटमळत राहतात. योग्य संधीची वाट पाहतात. रुग्ण बेसावध असताना जबरदस्त फटका देऊ शकतात. म्हणून अशा रुग्णांनी नियमितपणे बेलाची दहा पाने एक कप पाण्यात उखळून आटवून, तो अर्धा कप काढा प्यावा. जेवण विभागून जेवावे. दीर्घश्वसन, प्राणायाम यांचा युक्तीने वापर करावा.

हृदयरोग व मानसिक ताणतणाव
हृदयरोगसंबंधी तक्रारींना मानसिक ताणतणावांची जोड मिळाली की मग आजार अजूनही बळावतात. आज सगळ्ेच जणू फास्ट होत चालले आहे. तणावपूर्ण जीवनशैलीमुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण असते. क्षुल्लक कारणाने भांडणतंटे होत असतात. रात्रीच्या झोपेचा नुसता खेळखंडोबा होतो.
हृद्रोगी व्यक्तीला थोडाशाही श्रमाने, अधिक बोलण्याने, जिने चढ-उतार करण्याने छातीवर प्रेशर येतो किंवा दमायला होते. ही लक्षणे जेव्हा स्वतःला जाणवायला लागतात तेव्हा लगेच प्रत्येकाने जागे व्हायला पाहिजे, सावध व्हावे. अशा व्यक्तीने एक दिवस निवांतपणे आपल्या जबाबदारीचा, जीवनक्रमाचा आढावा घ्यावा. टाळता येण्यासारख्या जबाबदाऱ्या, कामे कमी करावीत. शक्यतो ठरल्याप्रमाणेच वागावे.

  • दैनंदिन टाइम टेबल करावे. लिहून आपल्या डोळ्यांसमोर राहील असे ठेवावे.
  • झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने किंवा तुपाने चोळावे.
  • शरीर व मनाला प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करावा.

हृदयरोग्यांकरिता पथ्यापथ्य

  • स्थूल व्यक्तीने आपणास हार्ट-ॲटॅकचा त्रास होऊ नये म्हणून कटाक्षाने आपल्या तोंडावर ‘ताबा’ ठेवायलाच हवा.
  • खूप चरबीयुक्त पदार्थ, गोडधोड, मांस-मटण, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, मिठाई, बेकरी पदार्थ खाऊ नयेत.
  • किती अन्न तुम्ही खाता व ते पचविण्याकरिता हिंडणे-फिरणे किती आहे याचे तारतम्य हवेच.
  • भरपूर हिंडणे, फिरणे, दीर्घ श्वसन, प्राणायाम, व्यसनरहीत राहणी असे राहायला हवे.
  • अतिकृश असा भरपूर शारीरिक श्रम व कष्ट करणाऱ्या हृद्रोगी पेशंटही आपले वजन घटणार नाही याला प्राधान्य द्यायला हवे.
  • वनस्पतीतूपयुक्त मिठाई, हॉटेलमधील आंबवलेले पदार्थ टाळावेत.
  • घरचे ताजे जेवण जेवावे.
  • सफरचंद, खरबूज, डाळिंब असा फलाहार घ्यावा.
  • लवकर विश्रांती घ्यावी, झोपावे.
  • मधुमेही, हार्ट पेशंटनी नियमितपणे बेलाच्या पानांचा काढा, पुदिना, आले, ओली हळद, लसूण चटणी, मेथी, ज्वारीची भाकरी, मूग व विभागून जेवण जेवावे.

अलीकडे तिशी-चाळिशीतच म्हणजे तरुणवयातच हृदयरोगाची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे. थोडाशाही कारणाने धापा लागतात, हार्टवर प्रेशर येतो. तरुण पिढीचे जीवन अतिशय धावपळीचे होत चालले आहे. खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या, पदार्थ बदलले आहेत. त्यामुळे हृदयरोगी तरुणवयातच वाढलेले आहेत.
टोमॅटोच्या रसात लायकोपिन नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो. या रसाचे सेवन हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट्स साठून रक्ताची गुळणी निर्माण होण्यास विरोध करते. त्यामुळे टोमॅटोचा रस हृदयासाठी फायदेशीर ठरतो. टोमॅटोचा रस ताजा काढलेला असावा.

  • लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा अशा ताज्या फळांमध्ये पुरेसे ‘सी’ जीवनसत्त्व असते. ही फळे ताजी खावीत. ही हृदयाला उत्तम बल देतात. रसामध्ये साखर व मीठ वापरू नये.
  • रताळं, बटाटे सोडून सर्व फळभाज्या, पालेभाज्या या बॅड कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास उत्तम आहेत.
  • भोपळा, पडवळ, घोसाळी अशा भाज्या उकडून खाव्यात.
  • रोज एका शहाळ्याचे पाणी पिण्यास द्यावे.