‘हुडहुड’ महाचक्रीवादळाने ताशी १८० कि. मी. वेगाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या दिशेने आगेकूच सुरू केली असून ते आज दुपारपर्यंत विशाखापट्टणम नजीक थडकणार असल्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने काल वर्तवला. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशच्या पाच किनारी जिल्ह्यांमधील १.११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्याआधी या प्रदेशांमध्ये पावसानेही जोर धरला आहे.महाचक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनातर्फे ५,१४,७२५ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. याचबरोबर लष्कर व नौदल यांची मदत पथकेही सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. ३७० मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
आंध्रप्रदेशच्या राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाचे आयुक्त ए. आर. सुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकुलम जिल्ह्यातील ३५ हजार लोकांना, विजयनगरमधील ६ हजार लोकांना, विशाखापट्टणम मधील १५ हजार लोकांना, पूर्ण गोदावरी येथील ५० हजार लोकांना व पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ५ हजार लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे वरिष्ठ अधिकार्यांसह विद्यमान स्थितीचा आढावा घेत आहेत. हुडहुडच्या आगेकूची बद्दलच्या ताज्या हालचालींविषयी तातडीने माहिती पाठवावी यासाठी नायडू यांनी भारतीय अवकाश संशोधन केंद्राला विनंती केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार १३ राष्ट्रीय आपत्कालीन सहाय्य पथके तयार ठेवण्यात आली असून येलंका तळ ते विशाखापट्टणम दरम्यान हवाई दलाची तीन हेलिकॉप्टर्स लक्ष ठेवून आहेत. सहा विमाने नौदलाच्या डेगा येथील तळावर तैनात आहेत. या महाचक्रीवादळाच्या तडाख्याने किनारपट्टीनजीकच्या कच्चा व मातीच्या घरांची नुकसानी होण्याबरोबरच मोठी झाडे पडणे, वीज पुरवठा बंद पडणे, संपर्क यंत्रणेत बाधा निर्माण होणे तसेच रस्ता व रेल वाहतुकीलाही अडथळा निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेने याआधीच अनेक मार्गांवरील रेलगाड्या रद्द केल्या आहेत.
ओडिशातही सज्जता
ओडिशातही किनारपट्टी भागांमधील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या भागांमधील ३९ रेलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरापूत, मलकनगिरी, नबरतपूर, रायगड, गजपती, गंजम, कलहंडी व कंधमाल या जिल्ह्यांमधील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.