‘हुडहुड’ धडकले

0
112
‘नासा’च्या उपग्रहाने टिपलेले वादळाचे छायाचित्र.

६ मृत्युमुखी; विशाखापट्टनमची मोठी हानी
हुडहुड महाचक्रीवादळ मुसळधार पाऊस आणि २०० कि.मी. प्रति तास वेगाने वाहणार्‍या सुसाट वार्‍यांसह काल आंध्र प्रदेश व उदिशाच्या किनारपट्टीला धडकले. वादळामुळे किनारपट्टीच्या भागाची भयंकर हानी झाली असून सर्वात जास्त फटका विशाखापट्टनमला बसला आहे. सर्व ती खबरदारी घेऊनही आंध्रात पाच तर उदिशात एक जण मृत्युमुखी पडला. मुसळधार पावसामुळे उदिशात पुराची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आंध्र भागातील अडीच लाख लोकांना तर उदिशातील एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, अजूनही हजारो लोकांना सरकारने सुरक्षित स्थळी उभारलेल्या आसर्‍यांमध्ये हलविण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, नौदलाचा महत्त्वाचा तळ असलेल्या विशाखापट्टणमला वादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. येथील श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
काल साधारण दुपारच्या वेळी वादळ धडकले. यात रस्ता वाहतूक व रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. वीज व दूरध्वनी यंत्रणाही कोलमडून पडली आहे. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले असून हजारो घरांवरील छपरे व झोपड्या उडून गेल्या. वादळांची संभावना असलेल्या सर्व भागांत लोकांनी घरात राहणे पसंत केले. विविध घटनांत सुमारे ३५ गुरे दगावल्याचे तर २ लाख ४८ हजार लोकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणी करून बचावकार्याची विचारपूस केली व मदतीचे आश्‍वासन दिले.
दरम्यान, वेधशाळेने काल संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० कि.मी/तास वेगाने आलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन १०० कि.मी/तास बनली होती. शिवाय पुढे डोंगराळ भाग असल्याने वार्‍यांची गती आणखी मंदावली आहे. मात्र येते तीन दिवस मुसळधार पाऊस चालू राहणार आहे. दरम्यान, वादळामुळे छत्तिसगढ, बिहार, पूर्व मध्यप्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश तसेच पश्‍चिम बंगालच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. उदिशात गंजम, गजपती, कोरापुट, पुरी, कलाहंडी आणि केंद्रापारा जिल्ह्यांना वादळाचा फटका बसल्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशात दळणवळण यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, बचावकार्य वेगाने चालू आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत पोचवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (प्रत्येकी ५० जणांचा सहभाग असलेल्या) २४ तुकड्या सध्या आंध्र किनारपट्टी भागांत कार्यरत असून आणखी तीन रवाना करण्यात आल्या आहेत. नौदल तळावर सहा हेलिकॉप्टर्स तैनात केली आहे. कार्यरत ५६ नौकांसह श्रीकाकुलम येथे नौका व इतर बचाव साहित्य तयार आहे.