पाटणा येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ रोजी नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी ९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने काल निर्णय देताना १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दोषी ठरलेल्या इतर सर्व ९ आरोपींना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या प्रकरणी आतापर्यंत १८७ जणांची न्यायालयात सुनावणी झाली आहे. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी ठरलेल्या ५ दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.