राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर राज्य सरकारच्या आरोग्यविषयक सज्जतेचा फुगा फुटला. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आता सरकार मुख्यत्वे केवळ कोरोनाची बाह्य लक्षणे दिसणार्यांचीच कोविड चाचणी करण्याच्या एका अत्यंत बेजबाबदार आणि घातकी निर्णयापर्यंत आलेले दिसते. काल जो नवा एसओपी जाहीर केला गेला आहे, त्यानुसार बाहेरून येणार्यांना हवे असेल तर कोविड चाचणी करून संस्थात्मक विलगीकरणात राहायचा किंवा चाचणीला थेट बगल देत चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनवर जायचा विकल्प दिला गेला आहे. म्हणजेच घुमून फिरून सरकार पुन्हा एकदा ‘होम क्वारंटाईन’च्या अत्यंत बेभरवशाच्या पर्यायाकडे परत आले आहे. त्यावर वरताण म्हणजे यापुढे सरकार स्वतःहून केवळ कोरोनाची बाह्य लक्षणे दिसणार्यांचीच कोविड चाचणी करील. यापुढे कोरोनाची रुग्णसंख्या कमी दाखवण्याचा हा भलताच चलाख उपाय म्हणायला हवा!
कोरोनाच्या जवळजवळ ९५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत याचा फायदा घेत राज्याची कोरोना रुग्णसंख्या अत्यल्प दिसावी यासाठी बॅकलॉगचे निमित्त देत त्यांच्या कोविड चाचण्याच न करण्याचा हा जो काही नामी तोडगा सरकारने काढला आहे तो सरळसरळ जनतेच्या जिवाशी खेळ मांडणारा आहे, कारण लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण हे संसर्ग मात्र नक्कीच पसरवत असतात. खरे तर कोविड चाचण्यांचा एवढा मोठा बॅकलॉग राहतो याचाच दुसरा अर्थ पुरेशा प्रमाणावर कोविड चाचण्या करण्याची क्षमता सरकारपाशी नाही असा होतो. त्याचीच कबुली जणू सरकारने या निर्णयातून दिलेली आहे.
कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढत चाललेला स्पष्ट दिसत असताना सरकारने खरे तर कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवून आणि वाढीव उपचारसुविधा उपलब्ध करून सध्या पडलेल्या कोरोनाच्या विळख्यातून गोव्याची सुटका करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, परंतु चाचण्या आणि उपचारांसंबंधीची आपली असमर्थता झाकण्यासाठी सरकारची पावले नेमकी उलट्या दिशेने पडताना दिसत आहेत. हा जो काही नवा एसओपी सरकार घेऊन आले आहे, तो त्यांच्यासाठी कातडीबचाऊ जरी असला तरी जनतेसाठी घातक आहे याची स्पष्ट जाणीव आम्ही सरकारला येथे करून देऊ इच्छितो. घरोघरी येणारे पाहुणे चौदा दिवस घरातील कोणाच्याही संपर्कात न येता संपूर्ण विलगीकरणाखाली राहतील हे गृहितकच पूर्णतः चुकीचे आणि घातकी आहे. घरातल्यांना या काळात संसर्ग झाला तर ती या चौदा दिवसांत बाहेर हिंडत फिरत असतील त्याचे काय? लक्षणविरहित कोरोना रुग्ण असे हिंडू फिरू लागले तर राज्यात कोरोनाचा झंझावाती सामाजिक संसर्ग अटळ असेल. गोवा आधीच धोक्याच्या वळणावर उभा असताना सरकार उचलत असलेले हे पाऊल कोरोनाच्या या महासंसर्गालाच जणू निमंत्रण देणारे आहे. यातून लक्षावधी गोमंतकीयांचा – विशेषतः त्यांच्या मुलाबाळांचा, वृद्धांचा, गरोदर स्त्रियांचा, दुबळी प्रतिकारशक्ती असलेल्या कुटुंबियांचा जीव आपण धोक्यात आलेला आहे. उद्या कोणाच्या जिवाशी बेतले, तर त्याला सरकारचा हा निर्णय सर्वस्वी जबाबदार असेल.
कोरोना म्हणजे काही विशेष नाही; नुसता थोडासा खोकला आणि ताप आहे, असे म्हणण्यापर्यंत काही मंत्र्यांची काल मजल गेलेली दिसली. कोरोना म्हणजे सर्दी, पडशासारखा एवढा किरकोळ, क्षुल्लक आजार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे तीस कोटींच्या या देशाला एवढ्या प्रदीर्घ लॉकडाऊनखाली का ठेवले आणि हा एवढा सारा जागतिक खटाटोप का चालला आहे याचे उत्तर या दीडशहाण्यांनी आधी द्यावे. जगात चार लाख लोक आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले आहेत आणि भारतामध्येही हे प्रमाण सात हजारांवर गेलेले आहे, त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर भले कमी असला, तरी आपल्या बेजबाबदार आणि लहरी तुघलकी निर्णयांनी गोवेकरांना नाहक त्याच्या जबड्यात ढकलण्याचा हा जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे तो समाजात भीतीचे, साशंकतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करणारा आहे. शेजारच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ज्या तडफेने कोरोनाशी झुंज देत आहेत, त्या पार्श्वभूमीवर इवल्याशा गोव्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण जरासे वाढताच आपल्या नेत्यांनी ज्या प्रकारे ‘ब्यां..ऽऽ’ केले ते खरोखरच कींव आणणारे आहे. भविष्यात गोव्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची त्यामुळे खरोखर आज चिंता वाटते. मांगूरहिलमध्ये कोरोनाचे स्थानिक संक्रमण आढळून येताच राज्याचे २२० खाटांचे एकमेव कोविड इस्पितळ रुग्णांनी खचाखच भरले. त्यावर नव्या कोरोना चाचण्याच स्थगित ठेवण्याची अचाट क्लृप्ती सरकारने काढली. आता वरताण म्हणजे लक्षणविरहित रुग्णांच्या चाचण्याच सरकार यापुढे स्वतःहून घेणार नाही. म्हणजे रुग्णसंख्या यापुढे आपोआप कमी दिसेल! वा रे सरकार! अर्थात अशा प्रकारची चतुराई दाखवण्यात संबंधित अधिकारी बरेच वाकबगार दिसतात. ज्या प्रकारे गोमेकॉतील चाचण्यांचे आकडे एकाच दिवशी न दाखवता आजवर दिवसाआड विभागून दाखवले गेले, आरोग्यसेतू ऍपवरील आकडे कमी दाखवले गेले, त्यातूनही ही चलाखी पूर्वी दिसली आहे. सरकार एक महत्त्वाची गोष्ट विसरते आहे ती म्हणजे, राज्यातील आजवरचे बहुतेक कोरोना रुग्ण हे बाह्य लक्षणविरहित आढळले हे जरी खरे असले, तरी वेळीच झालेल्या चाचण्यांमुळेच त्यांच्यावर तात्काळ उपचार होऊ शकल्यानेच ते त्यातून बरे झाले आहेत. जे बरे झाले त्याचे श्रेय गोवेकरांच्या प्रतिकारशक्तीला नव्हे, तर वेळेवर झालेल्या उपचारांना आणि अर्थातच वेळेवर झालेल्या चाचण्यांना जाते. ९५ टक्के लोकांच्या चाचण्याच जर आपण घेणार नसाल, तर एवढा मूर्खपणाचा निर्णय दुसरा नसेल. गोवेकर काही दैवी प्रतिकारशक्ती घेऊन जन्माला आलेले नाहीत. आपल्यासारखाच आहार आणि हवामान असलेल्या शेजारच्या महाराष्ट्रातील मृत्यूचा दर आजही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे गोवेकरांच्या प्रतिकारशक्तीवर सारे सोपवून कोरोनापुढे ही जी काही शरणागती सरकारने पत्करलेली आहे ती दुसरे तिसरे काही नसून उपचार आणि चाचण्या याबाबतच्या वाढीव सुविधा निर्माण करण्यातील स्वतःच्या अपयशावर बेमालूमपणे टाकलेले पांघरूण आहे!