ही अभिव्यक्ती?

0
6

इतिहासकारांचे अर्धवट संदर्भ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बेछूट अनुद्गार काढणाऱ्या एका तथाकथित विचारवंताचे दावे कसे बुद्धिभ्रम फैलावणारे आहेत हे शनिवारच्या अग्रलेखात आम्ही दाखवून दिले होते. हा विषय तेवढ्यावर थांबेल असे आम्हाला वाटले होते, परंतु आता अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुखवटा लावून छत्रपती शिवरायांविषयीची आपली मूळ बेजबाबदार विधाने झाकण्याचे धूर्त प्रयत्न त्यांच्या भगतगणांकडून सुरू झाल्याने अधिक तपशील देणे भाग पडते आहे. सदर महाशयांनी विचारलेला पहिला प्रश्न असा – गोव्याच्या नव्या काबिजादींमध्ये शिवशाही होती तर तिचा काळ कोणता, तिच्या कारभाराचे ठिकाण कुठे होते आणि कोण सरदार ते बघत होते. वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि ते स्थिरस्थावर व्हायला पुढची चार वर्षे लागली असेच गृहित धरले, तरीही महाराजांना फक्त तीस वर्षांचे सार्वजनिक आयुष्य लाभले. ह्यामध्ये अफझलखानापासून औरंगजेबापर्यंतच्या स्वराज्याच्या बलाढ्य शत्रूंशी त्यांनी आयुष्यभर सामना केला. परंतु ह्या अल्प काळातही त्यांनी अनेकदा गोमंतकाच्या दिशेने धडका दिलेल्या दिसतात. त्यातून पुढे पोर्तुगिजांनी नव्या काबिजादी म्हणून ज्याला संबोधले, तो प्रदेश अनेकदा महाराजांच्या ताब्यात आला आणि अनेकदा निसटला. ह्याचा वर्षवार, तारीखवार तपशील हवा असेल तर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने हे अस्सल कागदपत्रांचे तिन्ही खंड पाहावेत. ते सगळे विस्ताराने लिहायला येथे जागा नाही. पिसुर्लेकरांच्या पोर्तुगीज मराठा संबंध पुस्तकात केवळ पुणे विद्यापीठात दिलेली सात व्याख्याने आहेत, परंतु वरील ग्रंथांमध्ये डॉ. ए. डी. ब्रागांझा परेरा यांनी 1938 साली संकलित केलेली अस्सल कागदपत्रे आहेत. मणेरी, डिचोली, साखळी, फोंडा व इतर परगणे महाराजांच्या राजवटीखाली केव्हा केव्हा आले आणि केव्हा निसटले तो सारा वर्षवार तपशील तेथे मिळेल. कारभाराचे ठिकाण कोणते होते व कोण सरदार ते बघत होते हा त्यांचा पुढचा प्रश्न. अर्थातच डिचोली, फोंडे, बाळ्ळी वगैरे महालांची मुख्य गावे ही कारभाराची केंद्रे होती आणि नरसो काळो, धर्माजी नागनाथ, मोरो दादाजी वगैरे तेथील सुभेदारांचे नामोल्लेखही वेळोवेळी आढळतात. आदिलशाहीच्या सैन्याशी शिवाजी महाराजांच्या अनेक लढाया झाल्या व त्या सर्व महाराजांनी जिंकल्या अशी कबुली खुद्द पोर्तुगीज व्हाईसरॉय आंतोनियो दिमेलु द काश्त्रु यांनी 27 जानेवारी 1667 रोजी राजाला पाठवलेल्या पत्रात दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतरे रोखली नाहीत. ते रोखण्याएवढी शक्ती, इतके बळ शिवाजी महाराजांकडे होते का असा प्रश्न आपले वायंगणे विचारवंत विचारतात. प्रत्यक्षात विजापूरकरांना आणि पोर्तुगिजांना महाराजांचा कसा धाक होता ह्याचे असंख्य पुरावे आहेत. शाईस्तेखानाच्या स्वारीनंतर महाराजांनी कुडाळ मोहीम काढली तर डिचोली व साखळीच्या विजापूरच्या सुभेदारांनी भीतीने पळ काढला होता. शिवाजी महाराजांच्या वाटेस जाणे आपल्या हिताचे नाही असे मत पोर्तुगीज राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत स्वतः व्हाईसरॉयने मांडले होते. महाराजांची मोहीम येणार आहे हे कळताच पोर्तुगालला निघालेल्या व्हाईसरॉयला 20 मार्च 1668 च्या पत्राद्वारे भर समुद्रातून गोव्यात माघारी बोलावले गेले होते. शिवाजी श्रीमंत व बलाढ्य आहे व त्याच्या सामर्थ्याच्या मानाने आपले सामर्थ्य मर्यादित आहे असे स्वतः व्हाईसरॉय 28 मे 1677 च्या पत्रात म्हणतो. म्हणजे पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराजांना चळाचळा कापायचे हा इतिहास असताना आपले हे महाशय मात्र पोर्तुगिजांवर एवढा दबाव आणण्याएवढे महाराजांचे बळ होते का असा प्रश्न विचारतात तेव्हा खरोखर कीव येते. चार पिढ्यांनंतर येथील सर्व धर्मांतरे थांबली होती हा ह्यांचा आणखी एक युक्तिवाद. परंतु शिवकाळातही बार्देशमध्ये धर्मांतरे सुरू होती आणि व्हाईसरॉय कोंदि द सांव्हिंसेती हा त्यात सक्रिय होता हे लिस्बनमध्ये इ. स. 1680 साली प्रसिद्ध झालेल्या फ्रे. ज्यासिंतु द देऊस या पाद्य्राच्याच पुस्तकात नमूद केले आहे. तो असे लिहितो की बार्देशमधील सात हजार हिंदूंपैकी चार हजारांना बाप्तिस्मा दिला गेला आहे आणि उरलेल्या तीन हजारांच्या धर्मांतराचे प्रयत्न सुरू आहेत. ह्या व्हाईसरॉयचे दरम्यान निधन झाले. बार्देशचा पाय दुस क्रिस्ताऊं हा अधिकारी 5 जानेवारी 1678 च्या पत्रात लिहितो की कोंदी द व्हिंसेंतीला अकाली मृत्यू आला नसता तर बार्देशात हिंदूच दिसले नसते. 21 सप्टेंबर 1667 रोजी ह्याच व्हाईसरॉयने फर्मान काढले होते की दोन महिन्यांच्या आत बार्देशातील हिंदूंनी निघून जावे. ह्या फर्मानाची प्रत पोर्तुगीज राज्य सल्लागार मंडळाच्या अहवालाच्या चौथ्या खंडात आहे. महाराजांच्या बार्देश स्वारीमागे हिंदूंचा छळ हेही एक कारण होते याचा उल्लेख इंग्लीश फॅक्टरी रेकॉर्डस्‌‍ ऑन शिवाजी ह्या इंग्रजांच्या कागदपत्रांच्या पहिल्या खंडातही दिसतो. त्यामुळे केवळ पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये उल्लेख नाही म्हणून बार्देशवरील स्वारीची ही धर्मच्छळाची पार्श्वभूमी नाकारता येणार नाही. थोडी जरी लाज, शरम शिल्लक असेल तर महाराजांची मुकाट माफी मागावी आणि विषय संपवावा. उगाच आपल्या बेछूट, बेजबाबदार विधानांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे पांघरूण घालू नये.