
ऑस्ट्रेलियात सुरू असणार्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताची अनुभवी महिला नेमबाज हीना सिद्धूने मंगळवारी झालेल्या महिला नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. गोल्ड कोस्टमधील हीनाचे हे दुसरे पदक असून १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात हीनाला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते.
मंगळवारी झालेल्या नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तोल प्रकारात हीना सिद्धू आणि अन्नू सिंह भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. परंतु अन्नूचे आव्हान अकाली आटोपले. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हीना सिद्धू सुद्धा सुरुवातीच्या काही फेर्यांमध्ये दुसर्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या फेर्यांमध्ये हीनाने आपली कामगिरी उंचावत आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्या नेमबाजांना मागे टाकले आणि ३८ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या इलिना गालियाबोविचने ३५ गुणांसह रौप्य तर मलेशियाच्या अलिया साझाना अझाहारीला २६ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बाद फेरीतील तिसर्या प्रयत्नानंतर हीना व इलिनाचे प्रत्येकी २३ गुण झाले होते. चौथ्या प्रयत्नात हीनाने ४ गुण घेतले तर इलिनाला केवळ २ गुण घेता आले. हा फरक सुवर्णपदक विजेता ठरविण्यासाठी पुरेसा ठरला.
सकाळच्या सत्रात भारताच्या गगन नारंग आणि चैन सिंह या दोन खेळाडूंनी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात निराशा केली. २०४.८ गुणांसह चैन सिंह चौथ्या तर १४२.३ गुण घेत गगन नारंग सातव्या स्थानी राहिला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी एकूण तीन सुवर्ण पदके मिळवली असून हीनासोबतच मनू भाकर आणि जीतू राय यांनी सुवर्णपदकांची कमाई केली होती.