>> ‘क्रॉस व्होटिंग’मुळे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव; भाजपचे हर्ष महाजन विजयी; राज्यसभेच्या 15 जागांचा निकाल जाहीर
तीन राज्यांतील राज्यसभेच्या 15 जागांसाठी काल मतदान होऊन लगेचच निकाल जाहीर झाले. या निकालातून काँग्रेसला मोठा धक्का बसला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत नेते अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपच्या हर्ष महाजन यांनी बाजी मारली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते म्हणजे प्रत्येकी 34 मते मिळाल्यानंतर ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून भाजपचा उमेदवार जिंकला. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर आता त्या ठिकाणचे सुखविंदर सिंग सुखू यांचे सरकारही अल्पमतात आल्याची चर्चा आहे.
15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागा रिक्त झाल्या आहेत, त्यापैकी 12 राज्यांमधील 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 15 जागांसाठी काल मतदान झाले. त्यात उत्तर प्रदेशातील 10 जागा, कर्नाटकातील 4 जागा आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश होता. उत्तरप्रदेशातील 10 पैकी 8 जागा भाजपने जिंकल्या, तर 2 जागा समाजवादी पक्षाला मिळाल्या. कर्नाटकातील 4 पैकी 3 जागा काँग्रेसला, तर 1 जागा भाजपला मिळाली. सर्वात धक्कादायक निकाल हिमाचल प्रदेशमध्ये लागला. या ठिकाणच्या एका जागेवर पूर्ण बहुमत असूनही काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप उमेदवाराने बाजी मारली.
हिमाचल प्रदेशातील एका जागेवर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव केला. दोघांना 34-34 मते मिळाली. ईश्वरी चिठ्ठी टाकून विजेता ठरविण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 6 आमदार आणि 3 अपक्ष आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. क्रॉस व्होट करणाऱ्यांमध्ये राजेंद्र राणा, सुधीर शर्मा, देवेंद्र भुट्टो, आय. डी. लखनपाल, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा या काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. मतदानापूर्वी हे सर्वजण सकाळी एकाच वाहनातून विधानसभेत पोहोचले हेाते. विधानसभेच्या बाहेर गाडीतून खाली उतरताच भाजपचे आमदार बिक्रम ठाकूर आणि राकेश जामवाल यांनी त्यांची भेट घेतली. याशिवाय अपक्ष आमदार आशिष शर्मा, होशियार सिंह आणि के. एल. ठाकूर यांनीही भाजप उमेदवाराला मतदान केले. या राज्यसभा निवडणुकीत सर्व 68 आमदारांनी मतदान केले.
हिमाचलचे काँग्रेस सरकार अल्पमतात?
9 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या नेतृत्वाखालील हिमाचलचे काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांचे सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला असून, भाजप बुधवारी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार का हे पाहावे लागेल.
भाजपने काँग्रेस आमदारांचे अपहरण केले : सुखू
विधानसभेत काँग्रेसचे 40 आमदार आहेत आणि भाजपने घोडेबाजार केला नसता, तर सर्व मते आम्हाला मिळाली असती, असे मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले. भाजपने काँग्रेसच्या सहा आमदारांचे अपहरण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
कर्नाटकातील विजयी उमेदवार
कर्नाटकातील राज्यसभेच्या 4 जागांवर झालेल्या मतदानात काँग्रेसचे अजय माकन, नासिर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर विजयी झाले. भाजपकडून नारायण बंदिगे विजयी झाले.
उत्तरप्रदेशातील विजयी उमेदवार
उत्तरप्रदेशात भाजपच्या उमेदवारांनी 10 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपचे अमरपाल मौर्य, आरपीएन सिंह, साधना सिंह, संजय सेठ, संगीता बलवंत बिंद, सुधांशू त्रिवेदी, तेजवीर सिंग, नवीन जैन हे विजयी झाले. सपाकडून जया बच्चन आणि रामजी लाल सुमन हे विजयी ठरले.