‘हिट अँड रन’चा आणखी एक बळी

0
14

>> धारगळातील अपघातात वेंगुर्ल्यातील व्यक्ती ठार

>> राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

सुकेकुळण-धारगळ येथे काल दुपारी ‘हिट अँड रन’ची घटना घडली. एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात संजय सुरेश जळवी (50 वर्षे, रा. वेंगुर्ला) हे जागीच ठार झाले.

सविस्तर माहितीनुसार, संजय सुरेश जळवी हे आपल्या दुचाकीने (क्र. एमएच-07-व्ही-7161) काल दुपारी सव्वा तीनच्या सुमारास म्हापसामार्गे पेडणे येथे जात असताना सुकेकुळण धारगळ येथे एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते रस्त्यावर कोसळून जागीच ठार झाले. संजय जळवी यांनी हेल्मेट परिधान केले होते; मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जे लोखंडी खांब होते, त्या खांबाला त्यांची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते एका पेट्रोल पंपवर कामाला होते.
ही घटना घडल्यानंतर काही वेळाने नागरिक जमा झाले; परंतु कोणत्या वाहनाने त्यांना धडक दिली हे समजू शकले नाही. याचवेळी तेथून पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हे तेथून जात होते. त्यांनी घटनास्थळी थांबून मदतकार्यात सहकार्य केले. पोलीस आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. या अपघाताला जो कोणी कारणीभूत असेल, त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आर्लेकर यांनी केली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही टॅक्सी व्यावसायिकांनी माहिती देताना सांगितले की, ज्यावेळी हा अपघात घडला, त्या क्षणापासून काही मिनिटे आधी त्या ठिकाणी वाहतूक खात्याची (आरटीओ) वाहने होती. एक वाहन अपघात घडल्यानंतर लगेच पेडणेच्या दिशेने निघून गेले. दुसरे वाहन त्याच्या बाजूला उभे होते. त्यात दोन अधिकारी होते. त्यात एक वाहतूक अधिकारी बाहेर आला आणि त्याने अपघाताचे दृश्य पाहिले व तो निघून गेला. दुसरा वाहतूक अधिकारी वाहनातच बसून राहिला. त्या अपघातग्रस्त नागरिकाला काही मदत होईल या माणुसकीच्या भावनेने सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. अधिकाऱ्यांच्या या निर्ढावलेपणाबद्दल उपस्थित नागरिकांतून चीड व्यक्त होत होती.