हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला

0
3

>> लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले सुरूच

शुक्रवारी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला असून वैद्यकीय आणि सुरक्षा पथकांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून नसरल्लाहचा मृतदेह बाहेर काढला. हसन याच्या शरीरावर हल्ल्याच्या थेट खुणा नाहीत. मात्र त्याचा मृत्यू मोठा स्फोट झाल्यामुळे झाल्याचे लेबेनॉनने म्हटले आहे. दरम्यान, लेबेनॉनवर इस्त्रायलचे हल्ले सुरूच आहेत.

काल रविवारी इस्रायलने लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले. नसरल्लाह याच्या मृत्यूनंतरही इस्रायलने शनिवारी (28 सप्टेंबर) लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला, तर 195 जण जखमी झाले. एका दाव्यानुसार इस्रायलने नसरल्लाहला मारण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी 8 लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 15 बॉम्ब टाकण्यात आले. हे अमेरिकन बनावटीचे बॉम्ब होते. दरम्यान, रविवारी इस्रायलच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 17 जणांचा मृत्यू झाल्याचे लेबेनॉनने म्हटले आहे. इस्रायलने लेबनॉनच्या उत्तरेकडील बेका खोऱ्यातील जाबूद शहरात हा हल्ला केला.

हसन नसरल्लाह शहीद ः मेहबुबा

श्रीनगर : पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह हा शहीद झाला असल्याचे सांगून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी द वरील त्यांच्या पोस्टमध्ये, मेहबूबा यांनी, लेबनॉन आणि गाझा, विशेषतः हसन नसरल्लाह या शहीदांच्या समर्थनार्थ आपण उद्याचा निवडणूक प्रचार रद्द करत असल्याचे म्हटले आहे.