>> पालकांकडून संताप व्यक्त; प्राचार्य शंकर गावकर यांचे त्वरित निलंबन
हिंदू विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन नमाज पठण आणि मुस्लिम धार्मिक विधी करायला लावल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर काल दाबोळी येथील केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदू धर्मीय विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते एकवटले आणि त्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. त्यानंतर शिक्षण खात्याने या विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर यांना काल निलंबित केले.
दाबोळी येथील केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालय या अनुदानित शाळेच्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘मशीद दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे इस्लामिक स्टुडंट संघटनेने आयोजित केलेला हा उपक्रम शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार नाही. शनिवारी मशीद दर्शनासाठी गेलेल्यांमध्ये अकरावीतील काही विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी नमाज पठण करण्यापूर्वी मशिदीतील नियमानुसार सर्व धार्मिक कृती केल्या आणि नमाज पठणानंतर मशिदीत छायाचित्रेही काढली. यावेळी मशिदीत नमाज पठणाची सूचना करण्यात आल्यावर हिंदू विद्यार्थ्यांनी तेथे नमाज पठण केले. तसेच विद्यार्थिनींनी मशिदीत शालेय गणवेशाची ओढणी हिजाबप्रमाणे परिधान केली होती. या प्रकरणी शिक्षण खात्याने विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर यांच्यावर काल निलंबनाची कारवाई केली.
पोलीस तक्रार नोंदवण्याची मागणी करणार : म्हार्दोळकर
शंकर गावकर यांच्याबरोबरच केशव स्मृती विद्यालयाचे अध्यक्ष पांडुरंग कोरगावकर व त्यांची पत्नी तथा विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुषमा कोरगावकर यांच्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे. आपण मंगळवारी पर्वरी येथील राज्य शिक्षण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करून या तिघांच्या विरोधात वास्को पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी करणार आहे, असे चिखली पंचायतीचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी सांगितले.