हिंदुसूक्त ज्याच्या ओठी…

0
151
  •  दि. भा. घुमरे

अटलजी पंचतत्त्वात विलीन झाले असले तरी भूतकाळात डोकावल्यासही त्यांचे विचार दिसतील आणि भविष्याच्या गर्भीदेखील त्यांच्याच खुणा सापडतील. त्यांच्या शब्दशलाकेनं भारावलेले असंख्य जन भारतवर्षात आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांनी या तेजाची आरती करण्याचं औचित्य साधलं होतं. तेजस्वी शब्दांची ङ्गडङ्गडती मशाल आता निमाली असली तरी त्या ठिणग्यांनी अनेकांमधील प्रेरणेला साद घातली होती. हा लेख लिहिण्यासही असाच एक प्रेरणाक्षण कारणीभूत ठरला असेल…

पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च अधिकारांचे वजन लपेटून एका पारड्यात बसलेले वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभवसमृद्ध अटलजी आणि दुसर्‍या पारड्यात नुकत्याच दाढीमिशा ङ्गुटलेले, सळसळत्या रक्ताचे आणि ‘मेरा परिचय’ आत्मविश्‍वासाने कीर्तिमान करणारे अटलबिहारी असे जोखले तर दुसरे पारडे जड ठरेल यात शंका नाही. पहिल्या पारड्यात त्यांच्या एकावन्न कविता ओतल्या, तरीही ते पारडे दुसर्‍या पारड्याला पासंगाच्या जवळपासही असू शकणार नाही. ते कालही जड होते, आजही जड आहे आणि पुढेही जडच राहणार आहे. स्वत: वाजपेयी ‘मेरा परिचय’ विसरले असतील, पण त्या परिचयातील हिंदूंची अस्मिता, हिंदू संस्कृतीचे शील आणि या पुण्यपावन भूमीचे चिरवांच्छित हे प्रतिभासंपन्न काव्यातून हिंदूंच्या हाती आले ते काव्य कधीच ‘हिंदुसूक्ता’च्या कोटीला जाऊन बसले आहे.

रौद्ररसाचा आविष्कार
क्रुद्ध हिंदू, निर्भय हिंदू, पराक्रमी हिंदू, क्षमाशील हिंदू, करुणाकर हिंदू, मार्गदर्शक हिंदू, उपकारी हिंदू आणि सर्व कल्याणवादी हिंदू… अशा हिंदूंचा दाहक, तळपता आणि संजीवक परिचय करवून देणारे ‘मेरा परिचय’ हे अटलजींचे उमलत्या तारुण्यातील काव्य त्या काळच्या आम्हा तरुणांच्या नित्य पाठातील सूक्त होते.
हिंदु तनमन हिंदु जीवन,
रगरग हिदु मेरा परिचय ॥
मैं शंकर का वह क्रोधानल
कर सकता जगती क्षार-क्षार
डमरू की वह प्रलयध्वनि हूँ
जिसमें बजता भीषण संहार
रणचण्डी की अतृप्त प्यास
मैं दुर्गा का उन्मत हास
यम की प्रलयंकर पुकार
जलते मरघट का धुवॉंधार
ङ्गिर अंतरतम की ज्वालासे
जती में आग लगा दूँ मैं
यदि धदक उठे जलथल अंबर
जडचेतन ङ्गिर कैसा विस्मय?
स्वातंत्र्यसंग्रामाच्या त्या ज्वालाग्रही काळात व्यक्त झालेल्या अनेक आविष्कारातील हा सर्वसामान्यांना थेट जाऊन भिडणारा आविष्कार! परदास्यविमोचन, समाजपरिवर्तन आणि लोकाद्धार यासाठी इतिहासाने चोखाळलेला हा पहिला मार्ग… क्रोधाचा! अन्याय, अत्याचार आणि दास्य याविरुद्धचे गांधीयुगापूर्वीचे सर्व संघर्ष याच क्रोधातून उङ्गाळले. क्रांती! सशस्त्र क्रांती!! हाच सर्वमान्य मार्ग होता. या मार्गाची भारतीय परंपरा शंकराचे तांडव आणि रणचण्डी दुर्गेचे संकटनिवारक रूप अशा पौराण संचितापर्यंत जाऊन भिडते. ‘मेरा परिचय’च्या पहिल्या कडव्यातील रौद्ररसाचा हा जगड्‌व्याळ आविष्कार अजोड आहे.

निर्भयतेचे वरदान
क्रोध कसा हवा, तर निर्भयतेचे वरदान लाभलेला… शंकराने वस्तुपाठ दिलेला… निर्भयतेच्या आदिपुरुषाने हलाहल पचवून प्रशस्त केलेला…
मै आदिपुरुष निर्भयता का
वरदान लिये आया भू पर
पय पीकर सब मरते आये
मैं अमर हुआ लो विष पी कर
अधरों की प्यास बुझाई हैं
मैंने पीकर वह आग प्रखर
हो जाती दुनिया भस्मसात
जिसको क्षणभर भी छू कर
भय से व्याकुल दुनिया ने
प्रारंभ किया मेरा पूजन
मै नर नारायण नीलकंठ बन गया
न इसमें कुछ संशय
निर्भयतेचे वरदान घेऊन आलेल्या मला हिंदुत्व, हलाहल पचवून नीलकंठ बनलेल्या शंकराचा वारसा लाभला असल्याने या भूमीतील प्रत्येक पिढीमध्ये मृत्युंजय महावीरांची शृंखला अखंड सुरू आहे. रजपुतांचा, मराठ्यांचा, शिखांचा आणि अगदी अलीकडील काळातील कारगील लढाईपर्यंतचा इतिहास यास साक्षी आहे.
जगाचे गुरुस्थान
अर्थात क्रोध, पराक्रम, बलिदान, त्याग एवढाच ‘मेरा परिचय’ नाही. या भूमीत शस्त्र आणि शास्त्र बरोबरीने जपले जातात. केवळ शस्त्रे परजण्यासाठीच माझा जन्म नाही तर ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ हे माझे चिरवांच्छित असल्याने जगाच्या गुरुस्थानीही मी प्रतिष्ठित झालो आहे.
मैं अखिल विश्‍व का गुरू महान
देता विद्या का अमर दान
मैंने दिखलाया मुक्ति मार्ग
मैंने सिखलाया ब्रह्मज्ञान
मेरे वेदों का ज्ञान अमर
मेरे वेदों की ज्योति प्रखर
जगती के मन का अंधःकार
कब क्षण भर को भी सका ठहर
मेरा स्वर नभ में घहर घहर
सागर के जल में छहर छहर
इस कोने से उस कोने तक
कर सकता जगती सौरभ मय
परदेशातून नालंदा, तक्षशिला, विदिशा इत्यादी प्राचीन विद्यापीठांमध्ये अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत असत. अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा त्याने गुरूंचे दर्शन घेतले आणि ‘गुरुजी, मी आपणासाठी काय आणू?’ असे विचारले. तेव्हा गुरू म्हणाले, ‘तू भारतात गेलास तर माझ्यासाठी ज्ञान आण.’ या आख्यायिकेतूनच वर केला गेलेला दावा सार्थ ठरतो. वाजपेयी म्हणतात त्याप्रमाणे ‘मेरा स्वर नभ में घहर घहर| सागर के जल में छहर छहर’ शब्दब्रह्माचा, ओंकाराचा, घनगंभीर आद्यस्वर ही या भूमीची संपूर्ण विश्‍वाला केवढी मोठी देण आहे!
जगाचा विनाश करून आपला विकास केल्याचे एकतरी उदाहरण दाखविता येईल का? उलट या भूमीकडे आशेने आलेल्या शरणागतांचे तिने रक्षणच केले आहे. सूङ्गी आले, पारशी आले, ज्यू आले, शिया-अहमदीया आले. अगदी अलीकडे दलाई लामा आले आणि आता तर प्रचंड संख्येने बांगलादेशी येत आहेत. येथे या सर्वांचे रक्षण झाले. अर्थात त्यामुळे काही आपत्तीही ओढवल्या. पण, शरणागतांच्या रक्षणाचे ब्रीद सोडले नाही म्हणूनच आज…
यदि आज देहली के खंडहर
सदियों की निद्रा से जग कर
गुंजार उठे ऊँँचे स्वर से
हिंदू की जय तो क्या विस्मय?
या भूमीचे शील
या भूमीची इच्छा नेहमीच पवित्र होती. सच्ची होती. ही भूमी म्हणते,
होकर स्वतंत्र कब चाहा है मैंने
करलू जग को गुलाम?
मैंने तो सदा सिखाया हैं
करना अपने मन को गुलाम
गोपाल राम के नामों पर
कब मैंने अत्याचार किया?
कब दुनिया को हिंदू करने
घर घर में नरसंहार किया
कोई बतलाये काबूल में
जाकर कितनी मस्जिद तोडी?
भूभाग नहीं शतशत मानव के
हृदय जीतने का निश्‍चय
अटलजींचे प्रश्‍न रोखठोक आहेत आणि हिंदूंचे शीलही सोप्या भाषेत व्यक्त झाले आहे. पण इतके सरळपणे सांगून त्याचा कितीसा प्रभाव पडणार? म्हणून पुढील दोन कडवी. मनाला सदैव ताब्यात ठेवून इतरांची हृदये जिंकणार्‍या हिंदूला काय सोसावे, भोगावे लागले ते यामधून अटलजी सांगतात…
मैंने छाती का रक्त पिला
पाले विदेश के क्षुधित लाल
मुझको मानव में भेद नहीं
मेरा अंत:स्थल वर विशाल
जग के ठुकराये लोगों को
लो मेरे घर का द्वार खुला
अपना सब कुछ मैं लुटा चुका
ङ्गिर भी अक्षय है धनागार
मैं हीरा पाकर ज्योतित
उन लोगों का वह राजमुकुट
ङ्गिर इन चरणोंपर झुक जाये
कल वह किरिट तो क्या विस्मय?
मी आपल्या छातीचे रक्त पाजून आक्रमकांना पोसले, सोन्याचा धूर निघत असणारी भूमी त्यांनी लुटली. तरी मी त्यांच्यात भेद केला नाही. जगाने ठोकरून लावणार्‍यांना मी जवळ केले, आश्रय दिला. माझा कोहिनूर हिरा पळविला आणि आपल्या राजमुकुटात जडवला. पण आज… तोच राजमुकुट भारतापुढे झुकणार आहे.
मैं वीरपुत्र मेरी जननी के
जती में जौहर अपार
अकबर के पुत्रों से पूछो
क्या याद उन्हे चित्तौड दुर्ग में
जलनेवाली आग प्रखर
जब हाय सहस्रों माताएँ
तिल तिल जलकर हो गई अमर
वह बुझनेवाली आग नहीं
रग रग में उसे संजोये हूँ
यदि कभी अचानक ङ्गूट पडे
विप्लव लेकर तो क्या विस्मय?
आम्ही क्षमाशील आहोत, मानवतेचे पुजारी आहोत. पण ही क्षमाशीलता दुबळ्यांची नाही. रजपूत माता-भगिनींचे जोहार आम्ही विसरलेलो नाही. अकबराने भरवलेले कपटी मीनाबाजार आणि त्यात छद्मवेषधारी अकबरपुत्रांचे अनाचार, चितौडमधील कत्लेआम आणि अग्निकांडे ही सारी आमच्या स्मरणात आहेत. आक्रमकांच्या अन्याय-अत्याचाराचे स्मरण तरुण अटलजी हिंदूच्या सहिष्णू, क्षमाशील, रक्षणकर्ता, मानवतावादी आणि विश्‍वमांगल्यकारी स्वभावाच्या जोडीनेच करून देतात. जगाने हिंदूंना दुबळे आणि पुचाट समजू नये हाच त्यामागील विचार असतो. याचाच प्रत्यय त्यांनी प्रथम ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’ या आपल्या संसदेतील भाषणातून आणि दुसर्‍यांदा वैश्‍विक संदर्भात पोखरण स्ङ्गोट करून दाखवून दिला.