हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. कंपनीतील कामगारांकडून मिळणारी चुकीची वागणूक आणि दिवाळीमध्ये मालकाने कापलेला पगार यामुळे चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती, असा मोठा खुलासा पोलीस चौकशीत झाला आहे.
बसचालक जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. शंकर कोंडीबा शिंदे, गुरुदास खंडू लोखरे, सुभाष सुरेश भोसले, राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत.
बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडीतील फेज वन च्या जवळच भरधाव टेम्पो ट्रॅव्हल ने पेट घेतला होता. ट्रॅव्हल्समधून चालकाने उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला होता. इतर काही जणांनी देखील स्वतःला वाचवण्यासाठी धावत्या ट्रॅव्हल्समधून उड्या घेतल्या होत्या. याच दरम्यान चार जणांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. जखमींपैकी सहा जणांवर उपचार सुरू आहेत.
चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे.