हाय रे, ऍसिडिटी!

0
361
  •  डॉ. मनाली म. पवार

पथ्यापथ्याला ऍसिडिटीमध्ये फार महत्त्व आहे. आहार हलका, दीपन-पाचन करणारा, मधुर रसात्मक असावा. यव, गहू, मूग, जुने तांदूळ, तापवून गार केलेले पाणी, साखर, मध, पडवळ, भेंडी, दुधीभोपळा, नारळ, डाळिंब, दूध हे विशेष पथ्यकर आहेत.

ऍसिडिटी हा आजार सर्वांच्याच परिचयाचा. कोणत्याही डॉक्टरकडे रोज एखादा तरी पेशंट ऍसिडिटीचा असतोच. प्रत्येकाची ऍसिडिटी म्हणण्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. म्हणजे काहींच्या मते डोके दुखणे म्हणजे ऍसिडिटी. काहींच्या मते छातीत जळजळणे म्हणजे ऍसिडिटी. तोंडाला पाणी सुटणे किंवा अंगावर गांधी उठणे यालाही काही लोक ऍसिडिटी म्हणतात. २५ टक्के लोकांना महिन्यातून एकदातरी हा त्रास होतोच. आठवड्यातून एकदा त्रास होणारे लोकसुद्धा भरपूर आहेत. जगातील इतके लोक ऍसिडिटीने त्रस्त आहेत, तर ही ऍसिडिटी तयार तरी कशी होते?
‘ऍसिडिटी’ म्हणजे आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ‘अम्लपित्त’ होय.
‘अम्लगुणोद्रिवत्तं पित्तं अम्लपित्तम् |’
पित्ताचा जेव्हा अम्लगुण वाढतो व पित्त दूषित होते तेव्हा ‘अम्लपित्त’ाचा आजार होतो. म्हणजे शरीरामध्ये जे चांगले पित्त आहे ते कटू (तिखट) रसाचे असते. पण विदग्ध (आम) पित्त अम्ल रसाचे असते. जेव्हा या साम पित्ताची वृद्धी होते तेव्हा साहजिकच पित्ताचा अम्ल गुण वाढतो व अम्लपित्ताची उत्पत्ती होते.

अम्लपित्त हा एक चिरकारी (क्रॉनिक) असा आजार आहे. म्हणजे अनेक दिवस हेतू (कारणे) घडत राहून अम्लपित्ताची संप्राप्ती घडते. काल रात्री मसालेदार चमचमीत खाल्ले व आज ऍसिडिटी झाली असे बर्‍याच वेळा होत नाही. त्याला ऍसिडिटी न म्हणता अजीर्ण समजावे.
सध्या या पावसाळ्यात पित्ताचा संचय होत असतो आणि आपणही बाहेर पाऊस आहे म्हणून तळलेले, मसालेदार पदार्थ खात असतो. खरं तर या काळात हलका आहार घेणे अपेक्षित असते. कारण एक तर अग्नी मंद, त्यात पित्ताचा संचय काळ. मग अशा अवस्थेत पुन्हा पुन्हा विरुद्धाशन, दुष्ट भोजन, अति अम्ल-विदाही व पित्तप्रकोपक अन्नपानाचे सेवन केल्याने पित्त अधिकच विदग्ध होते आणि अम्लपित्त उद्भवते. म्हणून सध्या एखादा तरी पेशंट भूक लागत नाही, अन्न नकोसे वाटते किंवा घशाकडे जळजळते, उलटी आल्यासारखे वाटते किंवा संडासला साफ होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात.

ऍसिडिटीची कारणे ः-
* कडू – आंबट रसाच्या पदार्थांचे सेवन
* मसालेदार, अतिउष्ण, अतिस्निग्ध, अतिद्रव, अतिरूक्ष, पिष्टमय- जड- अभिष्यंदी अशा पदार्थांचे अतिसेवन.
* काकवी, खरवस, नवीन धान्ये, नवीन मद्याचे सेवन
* आंबवून तयार केलेले पदार्थ (ब्रेड, इडली, डोसा, ढोकळा, जिलबी इ.) यांचे अतिसेवन, नियमित सेवन. यांसारखे पदार्थ ऍसिडिटीला विशेषत्वाने कारणीभूत होतात.
* त्याचबरोबर फास्ट फूड, रेडी-टू-ईट, जंक फूड, बेकरी पदार्थ, चटपटीत मसालेदार पदार्थ हे सगळ्यांचे सध्या आवडीचे बनले आहे. जे घराघरांत बनवले जातात व सेवनही अतिप्रमाणात केले जातात, जे अम्लपित्तास किंवा ऍसिडिटीचे मुख्य कारण आहे.
* अयोग्य आहारसेवनाबरोबर अयोग्य विहारसुद्धा ऍसिडिटी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. उदा. मलमूत्राच्या वेगांचे धारण करणे, जेवणानंतर लगेच झोपणे; गरम पाण्याने फार वेळ स्नान करणे; गरम पाण्यात फार वेळ बसून राहणे.

त्याचबरोबर अध्यशन म्हणजे भरपूर खाणे किंवा उपवास करणे, शिळे अन्न खाणे (मुख्यतः महिलांमध्ये ऍसिडिटीचा त्रास असण्याचे हे मूळ कारण असते). जेवणामध्ये वरचेवर अति प्रमाणात पाणी पिणे किंवा जेवण झाल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणे… अशा पित्तप्रकोपक कारणांनी पित्ताला विदग्धता येते व अम्लपित्त किंवा ऍसिडिटी वाढते.

अग्निमांद्य असताना मिथ्या आहार- विहार चालू राहिल्याने अन्न अधिकच विदग्ध होते. पित्ताचा अम्लगुण वाढतो. घेतलेले अन्न आंबते. या आंबलेल्या अन्नामुळे अधिक विदग्धता… त्यामुळे अधिक पित्तप्रकोप… असे हे विषचक्र चालू राहते. ज्याप्रमाणे दह्याचे भांडे साफ न करता त्यात दूध घातले तर ते दूध लगेच आंबते, तसेच जर आमाशयात विदग्ध पित्ताचे आधिक्य असेल तर आपण पुढे पुढे अगदी साधा आहेर जरी घेतला तरी विदग्ध पित्ताच्या उपस्थितीत आहारही विदग्ध होतो. म्हणून अम्लपित्ताला चिरकारित्व येते.

ऍसिडिटीची सामान्य लक्षणे ः-
– अन्न न पचणे
– जरा जरी काम केले तरी धाप लागणे – क्लम
– उत्क्लेश – उचंबळून येणे
– आंबट कडू ढेकर
– छातीत जळजळणे
– कंठदाह (घशात जळजळणे)
– अरुची त्याचबरोबर पोट जड वाटणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, पोटात गुडगुडणे, पोटात हवा भरल्यासारखे वाटणे, कधी कधी शौचास पातळ होणे ही अम्लपित्ताची सामान्य लक्षणे
– उर्ध्वग अम्लपित्त असल्यास कडू-आंबट अशी उलटी येते व डोकेदुखी जास्त प्रमाणात होते. उलटी होऊन गेल्यानंतर बरे वाटते.
– अधोग अम्लपित्त असल्यास द्रवमल प्रवृत्ती होते व दूषित पित्त शरीराबाहेर गेल्यावर बरे वाटते. अम्लपित्ताचा त्रास जास्त वाढल्यास अंगावर मंडलोत्पत्ती होते.

ऍसिडिटीची सामान्य चिकित्सा ः-
* ऍसिडिटीमध्ये पित्त बर्‍यापैकी वाढत असल्याने व हा आमाशयातून उद्भवणारा आजार असल्याने वमन द्यावे. वमनानंतर मृदू विरेचन द्यावे. रोगी बलवान असेल तरच शोधन करावे अन्यथा शमनोपचार करावेत.

– शमनामध्ये प्रथमतः लंघन द्यावे, नंतर लघुभोजन. तिक्तरसप्रधान पाचन द्रव्ये द्यावीत. गुडूची, काडेचिराईत ही यातील महत्त्वाची औषधे.
– शंख भस्म, कपर्दीक भस्म, प्रवाळ पंचामृत, सुंठीसारखी औषधिद्रव्ये वापरावीत.
– सूतशेखर, कामदुधा ही ऍसिडिटीवरील उत्कृष्ट औषधे आहेत.
– ऍसिडिटीवरील सर्व औषधे लिंबू-सरबताबरोबर घेणे. कारण लिंबू हे अम्लरसात्मक असले तरी त्याचा विपाक मधुर आहे. शिवाय उत्कृष्ट अग्निदीपन करणारे द्रव्य आहे.
– ऍसिडिटीमध्ये शतावरीचाही खूप चांगला उपयोग होतो. शतावरी कल्प, शतावरी चूर्ण किंवा शतवीर्यादि काढा अशा विविध प्रकारे शतावरी वापरता येते.
अम्लपित्तामध्ये किंवा ऍसिडिटीमध्ये अशा प्रकारे चिकित्सा घेतल्यावर थोडेसे क्षुधावर्धन (भूक वाढते) होते. मग घृतपान घ्यावे.
पथ्यापथ्य ः-
– पथ्यापथ्याला ऍसिडिटीमध्ये फार महत्त्व आहे.
– आहार हलका, दीपन-पाचन करणारा, मधुर रसात्मक असावा.
– यव, गहू, मूग, जुने तांदूळ, तापवून गार केलेले पाणी, साखर, मध, पडवळ, भेंडी, दुधीभोपळा, नारळ, डाळिंब, दूध हे विशेष पथ्यकर आहेत.