>> संशयितास अटक; धारबांदोड्यातील घटना
धारबांदोडा तालुक्यातील एका हायस्कूलच्या शिपायाने रविवारी सुट्टीच्या दिवशी मैदानावर खेळणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांना मारहाण केली. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मैदानावर 8 मुले फुटबॉल खेळण्यासाठी गेली होती, त्यावेळी त्यांना शिपायाने मारहाण केली. पोलिसांनी हायस्कूलचे शिपाई प्रेमानंद गावडे (54, मूळ धारबांदोडा, सध्या रा. फोंडा) याला अटक केली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी येथील परिसरात राहणारी 8 मुले हायस्कूलच्या मैदानावर खेळण्यासाठी गेली होती. सर्व 8 मुले हायस्कूलजवळ राहत असली, तरी ती दुसऱ्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. ही मुले खेळत असताना अचानक हायस्कूलचा शिपाई प्रेमानंद गावडे हा मैदानावर येऊन दगडफेक करू लागला. त्यावेळी 8 पैकी 4 मुलांनी तेथून पळ काढत घर गाठले. उर्वरित 4 मुलांना शिपायाने मारहाण केली. मैदानावर गेलेल्या दोन मुलांच्या सायकलची मोडतोड देखील शिपायाने केली. या प्रकाराची माहिती पालकांना मिळाल्यावर पोलिसांना पाचारण करून शिपायाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पोलिसांनी संशयित प्रेमानंद गावडे याला अटक केली. जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांना इस्पितळात उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आले.