‘हायकमांड’ची पसंती अन्‌‍ नाराजीनाट्यामुळे मुख्यमंत्री निवड लांबली

0
3

>> निवडणूक निकाल लागून 8 दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवे सरकार नाहीच; चांगल्या खात्यांसाठी तिन्ही गटांमध्ये चढाओढ

सत्तास्थापनेबाबत माझी कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली खात्री आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नव्या मुख्यमंत्री निवडीस दिलेला पूर्ण पाठिंबा यानंतरही भाजपला महाराष्ट्रात अद्यापही नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे; मात्र भाजपच्या हायकमांडने अद्याप त्यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. फडणवीसांना वगळून राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरयाणाप्रमाणे ऐनवेळी एखादे नवे नाव भाजपकडून सादर केले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला गुरुवारी रात्री नवी दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज बनले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांना जी खाती हवी आहेत, त्यावर अद्याप सहमती झालेली नाही.

गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. तसेच जे. पी. नड्डा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही हजर होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला सर्वांनी पसंती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र अद्याप याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. जे. पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी कुठल्याही राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडण्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम मानला जातो. गेल्या दीड वर्षात राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरयाणात सरकार आल्यानंतर मोदी आणि शहांनी धक्कातंत्राचा वापर करत नवा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी दिला होता. तेच धक्कातंत्र महाराष्ट्रात देखील वापरले जाण्याची शक्यता आहे.
नाराजीनाट्याच्या चर्चांवर शिवसेना पक्षाचे आमदार उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी खरं सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना ताप होता, सर्दी होती. त्यांची प्रकृती चांगली नाही. पण ते नाराज नाहीत, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

महायुतीची मुंबईतील महत्त्वाची बैठक रद्द
मुंबईत शुक्रवारी होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली. दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीस, शिंदे व पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर काल मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात गृह व वित्त मंत्रालयाची मागणी केली आहे. भाजपला ही मंत्रालये शिवसेनेला द्यायची इच्छा नाही. यावर निर्णय न झाल्याने महायुतीची शुक्रवारची बैठक रद्द करण्यात आली.

मुंबई सोडून शिंदेंनी तडकाफडकी गाव गाठले
नवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निवडीसाठी चर्चा सुरू असून, त्यात नाराजीनाट्याचा अंक रंगल्याची चर्चा आहे. दुसरीकडे चर्चेकरता दिल्लीत गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी सातारा येथे परतले आहेत. त्यामुळे नाराजी नाट्याच्या चर्चेला जोर आला आहे.