… हवा मायेचा आसरा!

0
315
  •  चंद्रकांत रामा गावस
    (खोलपे-साळ)

जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारे प्रश्‍न, परीक्षा व समस्याच नव्हे तर प्रत्यक्ष बिकट काळाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी लागणारा अनुभव गाठीशी असलेले ज्येष्ठ नागरिक हे ओझे नसून समाजाचे तसेच कुटुंबाचे भूषण नाही का? त्यांचा योग्य तो मान राखून त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाने करून घ्यावा.

१ ऑक्टोबर ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. ज्येष्ठांच्या सन्मानाचा हा आनंददायी दिवस हा दिवस शासकीय पातळीवर, ज्येष्ठ नागरिक कल्याणार्थ झटणार्‍या संस्था संघ-संघटना यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु एक दिवसीय गौरव दिनाने ज्येष्ठांच्या समस्यांचे निराकरण होईल का? त्यांना कुटुंबीयांकडून, समाजाकडून दिलासा मिळेल का… याचा सारासार विचार व्हायला हवा. त्यांना आदराने वागणूक मिळायला हवी. त्यांना वार्धक्य समयी भेडसावणार्‍या अनेक समस्या कुटुंबीयांकडून, समाजकार्यकर्त्यांकडून सोडविण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

ज्येष्ठांना हवी मायेची ऊब, सुखाचे चार शब्द आणि त्यांची कुटुंबीयांकडून व्हायला हवी देखभाल. पण समाजात अनेक ज्येष्ठांची कुटुंबीयांकडून परवड झालेली दिसून येते. आजच्या तरुणाईला आपल्या कुटुंबात ज्येष्ठ माणसे म्हणजे अडगळ वाटते. त्यांची जबाबदारी त्यांना नकोशी वाटते. जन्मदाते आई-वडीलही मुलांना डोईजड वाटतात. म्हणून बरेचजण आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात.
साधारणपणे साठीनंतरच्या मंडळींना वृद्ध अथवा ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधतात. नोकरी करणारे याच वयात सेवानिवृत्त होत असतात. कारण निसर्ग नियमानुसार या काळानंतर त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता कमी होत जाते.

वार्धक्याची सर्वप्रथम चाहूल लागते ती त्याच्या त्वचेवरून. वाढत्या वयाबरोबर कातडीची जाडी व लवचिकता कमी होत जाते. चेहर्‍यावर व त्याच्या शरीरावर सुरकुत्या पडतात. त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे शरीरावर साधा ओरखडा आला तर, रक्त पटकन बाहेर येते. स्नायूंची ताकद व आकार बदलू लागल्याने हाडेही ठिसूळ होतात. सांध्याची हालचाल मंदावते. पाठीतील मणक्यांची कूर्चा आकसते. त्यामुळे पाठ -कंबर दुखी सुरू होते. पाठीला पोक येते. दात पडतात. काहींना टक्कल पडते. केस पांढरे होतात. वार्धक्याची म्हणजेच वृद्धत्वाची वाटचाल सुरू झाल्यानंतर अशी अनेक शारीरिक दुखण्यांची लक्षणे दिसून येतात.

मानवी शरीर हे जैविक यंत्रच आहे. वृद्धापकाळात अनेक आजारपण वृद्धांच्या मानगुटीवर सहजपणे बसतात. कारण वाढत्या वयाबरोबर वृद्धजनांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत जाते. साध्या आजारालाही वृद्ध माणसे बळी पडतात. उदा. डोळ्यांचे आजार- मोतीबिंदू, अथवा काचबिंदू, श्‍वसनाचे आजार, हृदयाचे आजार, कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, किडणी फेल, लघवीच्या तक्रारी, वातविकार, झोपेच्या तक्रारी बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांनी वृद्ध त्रासून जातात.

वार्धक्यात आरोग्यरक्षणासाठी काय करावे… याचाही वयोवृद्धांनी विचार करावयास हवा. ‘आपले शरीर थकले आहे. दुर्बल बनले आहे’… असे म्हणून खाटेवर झोपून वृद्धांनी कुढत राहू नये. आपले आरोग्य नीट रहावे यासाठी वैद्यकीय सल्ला डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे. वारंवार वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे योग्य औषधोपचार केला पाहिजे. सकस आहार सेवन केला पाहिजे. जमेल तसा व्यायाम करावयास हवा. प्राणायाम व योगासने केली पाहिजेत. चालणे, निसर्गात भ्रमंती करणारे असे उपक्रम केले पाहिजेत. त्यामुळे निरोगी व निरामय जीवन बनते. शरीर ही तंदुरुस्त राहते.

वृद्धावस्थेत वृद्धजनांचे मानसिक संतुलन बिघडते. मेंदूवरही वाढत्या वयाचा परिणाम होत असतो. विसरभोळेपणा वाढतो. कारण या काळात चेतापेशी वाढत नाहीत किंवा पुनरुज्जीवित होत नाहीत. त्यामुळे मेलेल्या किंवा दुर्बल बनलेल्या पेशींची जागा कोणीही घेत नाही. या कारणामुळे समोरच्या माणसाने एखादी सांगितलेली गोष्ट तीन -चारदा सांगितली तरी त्या वृद्धाच्या लक्षात येत नाही किंवा लवकर विसरतो. पण आठवण झाल्यावर तोच विषय चघळत राहतो. अशा ज्येष्ठांची समाजात चेष्टाच केली जाते.

काही वृद्ध माणसे आपल्या वृद्धत्वाच्या काळात आयुष्याच्या पूर्वार्धात घडून गेलेल्या गोष्टींची बेरीज -वजाबाकी करीत बसतात. त्यामुळे अनेक गोष्टींबाबत त्यांचे मन उगाचच पोखरत जाते. त्यातूनच वाढत जातो मानसिक ताण – तणाव. अशी ज्येष्ठ मंडळी चिडचिडी बनतात. त्यामुळे घरातील माणसांना ती ज्येष्ठ मंडळी नकोशी वाटतात.
ज्येष्ठ नागरिक सुखी आणि दीर्घायू बनले पाहिजेत यासाठी ज्येष्ठांनी विरंगुळ्याचा मार्ग चोखाळला पाहिजे. आपले उर्वरित आयुष्य ताण-तणावविरहीत मजेत घालविले पाहिजे. यासाठी वयोवृद्ध माणसांनी काही छंदात आपले मन गुंतविणे आवश्यक आहे. उदा. खेळ, वाचन, भजन, गायन, इतरांशी सुसंवाद साधणे, अध्यात्म कीर्तनात सहभाग अशा विविध उपक्रमात सहभागी व्हायला हवे. मन रिकामं राहिलं तर मनात दुःखदायक असे अनेक प्रश्‍न उठून मन सैरभैर बनतं. अनेक विवंचना मनात घुटमळत राहतात. तसेच वृद्धांच्या ठिकाणी मानसिक व शारीरिक तक्रारी पाचवीला पुजलेल्या असतात. अशा अवस्थेत त्यांनी कार्यरत राहिल्यास त्यांचे नैराश्य नाहीसे होते.
आज बर्‍याच कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांची परवड झालेली दिसून येते. याचे कारण जनरेशन गॅपचा परिणाम की काय? असा प्रश्‍न सहृदयी माणसाच्या मनात डोकावताना दिसून येतो. ज्येष्ठ नागरिकांना जगण्यासाठी काय हवंय? त्यांचा वृद्धापकाळ सुकर आणि सुखाचा होण्यासाठी आम्ही त्यांचा सांभाळ करतो का? या प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरित राहतात आणि आपल्या नजरेसमोर उभी राहते ज्येष्ठ नागरिकांची होणारी परवड.

आजच्या काळातील बदलती जीवनशैली नव्या पिढीला संस्कारापासून दूर नेत आहे. त्यामुळे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, ज्येष्ठांकडे प्रदीर्घ अनुभवांची शिदोरी असते. त्यांचे उत्तम मार्गदर्शन हा नव्या पिढीला आदर्श धडा असतो. जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारे प्रश्‍न, परीक्षा व समस्याच नव्हे तर प्रत्यक्ष बिकट काळाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी लागणारा अनुभव गाठीशी असलेले ज्येष्ठ नागरिक हे ओझे नसून समाजाचे तसेच कुटुंबाचे भूषण नाही का? याचा सखोल विचार व्हायला हवा.

पूर्वी वाडा संस्कृती व एकत्र कुटुंबपद्धतीने पणजोबा, आजोबा, आई-वडील त्यांची मुले, नातवंडे एकाच घरात गुण्यागोविंदाने राहायची. त्यामुळे त्या कुटुंबात ज्येष्ठांची जपणूक योग्य पद्धतीने केली जात असे. ज्येष्ठांचा यथोचित मान व आदर राखला जात होता. पण आता फ्लॅट संस्कृती उदयाला आली असून विभक्त कुटुंबपद्धती साकारत असल्यामुळे आपल्याच घरची मंडळी नकोशी वाटतात.

ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला. लहानाचं मोठं केलं. आपल्याला सांभाळलं, शिक्षण दिलं. उपजीविकेचे साधन दिलं, त्यांना उपेक्षित ठेवण योग्य आहे का? त्यांचे न्याय हक्क डावलणं हे लाजिरवाणे नाही का? याची जाणीव मुलांना, ज्येष्ठांच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाइकांना होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने ज्येष्ठ नागरिक कायदा २००७ साली सबंध देशात लागू केलेला आहे. या कायद्यान्वये ज्येष्ठ नागरिक आणि पालक उदरनिर्वाह आणि त्यांच्या कल्याणार्थ तरतुदी केल्या आहेत. त्या पूर्वीच्या इंडियन पिनल १२५च्या अंतर्गत पालक उदरनिर्वाहाची पोटगी मागू शकतात. असे जरी असले तरी मुलांचा जांच सहन करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक मुलांविरुद्ध तक्रार करण्यास पुढे होत नाहीत. कारण कोर्टात किंवा पोलिसात तक्रारी केल्यास मुलांचे तसेच कुटुंबाचे नाव बदनाम होईल म्हणून वयोवृद्ध माणसे मुलांचा छळ मुकाट्याने सहन करतात.

आज ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासन सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवतात. ज्येष्ठ माणसांचा वेळ जात नाही, त्यांच्या मनाला विरंगुळा मिळत नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनतात. अशा ज्येष्ठांच्या मनाचं दुखणं दूर करण्यासाठी गोवा सरकारच्या समाजकल्याण खात्याची ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी सुरू केलेली ‘उम्मीद’ केंद्रांची संकल्पना ज्येष्ठांच्या हितासाठी कार्यान्वित केली गेली आहेत. अशी अनेक ‘उम्मींद’ विरंगुळा केंद्रे गोव्यातील नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत. यात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येते. आनंद घेता येईल अशा कार्यक्रमांचे आयोजन या केंद्रात होते. यात ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, समाज प्रबोधनपर भजन, कीर्तन, ग्रंथपठण, अध्यात्म, मनोरंजक खेळ, सकस अल्पोपाहार, व्याख्याने, व्यायामासाठी प्राणायाम, योगासने, ज्येष्ठांच्या सहली अशा प्रकारचे वयोवृध्दजनांच्या विरंगुळ्यासाठी अनेक उपक्रम या ‘उम्मींद’ केंद्रामार्फत राबविले जातात.

ज्येष्ठांना ओळखपत्र समाजकल्याण खात्याच्या वतीने दिले जाते. त्यामुळे गोव्यात कुठेही प्रवास करताना ज्येष्ठांना अर्धे तिकीट सवलत मिळते. पण ही सवलत केवळ ‘कदंब’ बसमध्ये मिळते. ती सवलत खाजगी बस मालकांनीही द्यावी अशी सिनिअर सीटिझन फोरम व अन्य ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संस्थामधून मागणी केली आहे. तरी त्याचा शासनाने लाभ करून द्यावा. ज्येष्ठ नागरिकांना ‘हेल्थ कार्ड’ पुरविण्यात येते ते सादर केल्यावर काही मेडिकल स्टोअरमध्ये १० ते १५ टक्के बिलात सवलत मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने केलेले साहाय्य अर्थपूर्ण आहे. गेल्या दशकडीत डिचोली गोवा येथे बाबा सावईकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘सेकंड इनिंग्ज’ ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र तेथील तरुण उद्योजक रमाकांत (बाबू) शेट्ये यांनी सुरू करून ज्येष्ठांना मायेचा आधार दिला आहे. त्यांच्या विरंगुळ्याची सोय केली आहे. रमाकांत शेट्ये यांचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे.

ज्येष्ठ नागरिक हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांचा योग्य तो मान राखून त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाने करून घ्यावा, असे उगवत्या पिढीला आवाहन करून मी माझे लेखन थांबवतो. जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य व सुखी जीवन लाभो हीच सदिच्छा !