हरियाणामधील हिसारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही राजकीय कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. मात्र ब्रिजेंद्र सिंह यांच्याराजीनाम्यामुळे हिसारमध्ये भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजप का सोडली, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आपण राजकीय कारणास्तव भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
उमेदवारीची शक्यता
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रिजेंद्र सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी काही वेळ चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेंद्र सिंह यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजप सोडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिजेंद्र सिंहांना आता काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.