हरियाणात कोण?

0
7

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. गेले दोन कार्यकाळ तेथे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक हॅटट्रिक करण्याची संधी देणार की काँग्रेस पक्ष दहा वर्षांनंतर भाजपची तेथील सत्ता उलथवण्यात यशस्वी होणार ह्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या तेथील सरकारला अँटी इन्कम्बन्सीचा सामना तर करावा लागणार आहेच, शिवाय शेतकरी आंदोलनाला केंद्रातील भाजप सरकारने ज्या प्रकारे हाताळले त्याविषयीचा प्रचंड असंतोष, विनेश फोगाट प्रकरणामुळे निर्माण झालेली नाराजी ह्या आणि इतर कारणांमुळे भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकेल का ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला पाच जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे काँग्रेस आपला जुना करिष्मा दाखवून हरियाणात पुनरागमन करणार का ह्याकडे देशाचे लक्ष आहे. भुपिंदरसिंग हुडांसारखे अनुभवी माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. जाट, दलित, मुसलमानांची मते ह्यावेळी आपल्याच पक्षाच्या पारड्यात पडतील अशी खात्री त्यांना वाटते आहे. मात्र, हुडांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी कुमारी शैलजा ह्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी पक्षाच्या प्रचारात सुरवातीला भागही घेतला नव्हता. मात्र, त्यांना नंतर प्रचारात सहभागी करून घेण्यता आले. परंतु हे मनोमीलन कितपत झाले आहे हे निकाल सांगतील. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवूनही नंतर सत्तेत जाऊन बसलेल्या दुष्यंत चौटालांच्या जननायक जनता पार्टीचा भाजपबरोबरचा संसार यावर्षी मोडला. पण भाजपने आपले सरकार वाचवण्यात यश मिळवले. जेजेपी आता आझाद समाज पार्टीशी हातमिळवणी करून रिंगणात उतरली आहे, परंतु ‘गद्दार’ गणले गेलेले दुष्यंत चौटाला यांना यावेळी कितपत जनसमर्थन मिळेल हे सांगता येत नाही. गेल्या वेळी त्यांना दहा जागा मिळाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि काही मंत्रिपदांच्या बदल्यात भाजप सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत शिरकाव केला होता, परंतु ह्यावेळी त्यांच्या पक्षाला सौदेबाजी करण्याएवढ्या जागा तरी जिंकता येतील का हे पाहावे लागेल. आम आदमी पक्षही रिंगणात आहे. परंतु खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच. नायबसिंग सैनी यांच्या रूपाने एक मागासवर्गीय मुख्यमंत्री भाजपने दिला आहे. परंतु त्यामुळे हरियाणातील प्रबळ जाट समुदायाची मते एकगठ्ठा काँग्रेसच्या पदरात पडणार का हे पाहावे लागेल. हातातोंडाशी आलेले ऑलिम्पिक पदक गमावलेली विनेश फोगाट काँग्रेसच्या बाजूने निवडणुकीत उतरलेली आहे. तेही भाजपसाठी अडचणीचे आहे. आपल्याला पुन्हा सत्ता दिल्यास हरियाणाच्या जिल्ह्याजिल्ह्यात ऑलिम्पिक नर्सरी उभारू म्हणत नवे ऑलिम्पिकपटू घडवण्याचा वायदा जरी भाजप सरकारने केलेला असला तरी कुस्तीपटू संघटनेच्या अध्यक्षांविरुद्धचे आंदोलन ज्या उद्दामपणे हाताळले गेले, त्याबाबत हरियाणाच्या जनतेमध्ये नाराजी आहेच. हरियाणा हे कृषिप्रधान राज्य असल्याने शेजारच्या पंजाबप्रमाणेच तेथील शेतकऱ्यांच्या मनातून केंद्र सरकारप्रतीचा राग गेलेला दिसत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही त्या असंतोषाचे पडसाद उमटणार का हे पाहावे लागेल. काँग्रेसचा उत्साह ह्या निवडणुकीत दुणावलेला दिसतो. प्रदीर्घ काळानंतर हरियाणाची सत्ता काबीज करण्याची संधी समोर आहे असे पक्षाला वाटते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपकडून पाच जागा हिरावून घेण्यात काँग्रेसला यश आले आहेच, शिवाय पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्याची मतदारांना दिलेली ग्वाही, जातीय जनगणना करण्याचे दिलेले आश्वासन, महिलांना मासिक दोन हजार रुपये देण्याची योजना ह्यामुळे मतदार ह्यावेळी आपल्या बाजूने राहतील असे काँग्रेसला वाटते. शिवाय हरियाणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेला अग्नीवीरसारखा प्रश्नही काँग्रेसने समोर आणला आहे. त्यामुळे ‘किसान, जवान, संविधान’ ही घोषणा देत काँग्रेसने ह्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. भारतीय जनता पक्षालाही ही विधानसभा निवडणूक आपल्यासाठी सोपी जाणार नाही ह्याची जाणीव आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी महिला केंद्रित प्रचारावर भाजपने ह्यावेळी भर दिलेला दिसला. हरियाणामध्ये दहा औद्योगिक शहरे उभारण्याची आणि त्याद्वारे पन्नास हजार रोजगार पुरविण्याची ग्वाही भाजपने दिली आहे. शिवाय डबल इंजिन सरकारचा वायदाही आहेच. मात्र, भाजपसमोरील आव्हान ह्यावेळी कडवे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नुसत्या जागाच गमावलेल्या नाहीत, तर बारा टक्के मतेही गमावली आहेत. काँग्रेस नेतृत्व त्याचा कसा फायदा उठवते त्यावर निकाल अवलंबून असतील.