जकार्ता
तिरंदाज हरविंदर सिंग याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तित रिकर्व्ह प्रकारात काल सुवर्णपदक मिळविले. ट्रॅक अँड फिल्ड ऍथलिट्सनी एक रौप्य व एक कांस्यपदक काल भारताच्या झोळीत टाकले. मोनू घांगस याने पुरुषांच्या थाळी फेक एफ ११ प्रकारात रौप्य तर मोहम्मद यासर याने पुरुषांच्या गोळाफेकीत एफ४६ प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. हरविंदरने सुवर्णपदकासाठीच्या लढतीत चीनच्या झाओ लिक्से याचा डब्ल्यू२-एसटी प्रकारात ६-० असा पराभव करत भारताची सुवर्णसंख्या सात केली. घंगास याने आपल्या तिसर्या प्रयत्नात ३५.८९ मीटर अंतरवर थाळी फेकली. इराणचा ओलाद महदी याने ४२.३७ मीटरसह सुवर्ण जिंकताना स्पर्धा विक्रमाची नोंद केली. गोळाफेकीत कझाकस्तानच्या मन्सुरबायेव राविल याने १४.६६ मीटरवर गोळा फेकत रौप्य तर यासरने १४.२२ सह कांस्य पदक आपल्या नावे केले. चीनच्या वेई इनलॉंगने स्पर्धाविक्रम करत १५.६७ मीटरसह सुवर्ण मिळविले. कनिका इरुदयाराजने वैयक्तिक स्टँडर्ड पी१ बुद्धिबळ प्रकारात रौप्य तर भाविनाबेन पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य कमाई केली. ८० किलो पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ७ सुवर्ण, १२ रौप्य व १७ कांस्यपदके भारताच्या खात्यात जमा झाली आहेत.