केंद्रातील सत्ताधारी आघाडीला धक्का
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रथमच फूट पडली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी हरयाणातील हरयाणा जनहीत कॉंग्रेस या पक्षाने एनडीए आघाडीबरोबरील संबंध तोडले आहेत. यासंदर्भात हरयाणा जनहीत कॉंग्रेसचे नेते कुलदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. बिष्णोई यांनी वरील घोषणा करताना भाजपला विश्वासघातकी असेही संबोधले. ‘भाजपचा इतिहास तपासला तर हा एक विश्वासघातकी पक्ष असल्याचे स्पष्ट होते. अशा पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवू शकत नाही’ असेही ते म्हणाले. यावर भाजपनेही बिष्णोई यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी सांगितले की हरयाणाच्या लोकांना भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. तेथील जनता हरयाणा जनहीत कॉंग्रेसवर नाखूष आहे. मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर एनडीएला हा पहिला धक्का आहे. यामुळे एनडीए आघाडीत खळबळ उडाली आहे. हरयाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. जागा वाटपासंदर्भात अमित शहा यांच्याबरोबर चर्चेसाठी बिष्णोई दिल्लीत गेले होते. मात्र शहा यांनी त्यांच्याशी चर्चाच केली नाही. त्यामुळे हरयाणा जनहीत कॉंग्रेस एनडीएतून बाहेर पडणार अशी चर्चा सुरु झाली होती.