2500 महिला-मुलांनी घेतला मंदिरात आसरा
हरयाणाच्या मेवातमधील नूह येथे सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि गोळीबारही करण्यात आला. पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. या हिंसाचारानंतर 2500 पेक्षा जास्त पुरुष, महिला व मुलांनी मंदिरात आसरा घेतला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात 20 जण जखमी, तर दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे; मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गवाहिनी यांच्यातर्फे दरवर्षी नूह परिसरात बृजमंडल यात्रेचे आयोजन केले जाते. काल बजरंग दल आणि गोरक्षक दलाने नूह येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ब्रजमंडल यात्रा नूह येथील नल्हाड शिवमंदिरापासून फिरोजपूर-झिरकाच्या दिशेने निघाली. ही यात्रा तिरंगा पार्कजवळ पोहोचताच तेथे आधीच दुसऱ्या गटातील लोकांचा जमाव तेथे जमला होता. ते समोरासमोर येताच दोन्ही बाजूंनी वाद झाला आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर गोळीबार झाला. तसेच वाहनांची देखील जाळपोळ करण्यात आली.
हा हिंसाचार गोरक्षक मोनू मानेसर याच्यामुळे उफाळल्याची चर्चा आहे. मोनू मानेसर हा भिवानीतील दोन मुस्लिम तरुणांचे अपहरण करून जिवंत जाळल्याच्या प्रकरणात संशयित आहे. मोनू मानेसर हा गेल्या 5 महिन्यांपासून फरार आहे. त्यानेच लोकांना या बृजमंडल यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन रविवारी एका व्हिडिओद्वारे केले होते. दरम्यान, 2 रोजीपर्यंत या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे.