>> 90 जागांसाठी 1031 उमेदवार निवडणूक आखाड्यात
हरयाणा विधानसभेसाठी आज (दि. 5) मतदान होणार असून, निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विधानसभेच्या 90 जागांसाठी 1031 उमेदवार रिंगणात असून, 2 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यानंतर 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचा सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला यावेळी मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. याशिवाय जेजेपी, एएसपी, बसपा, आम आदमी पक्ष देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे.
हरियाणात एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 73 जागा सर्वसाधारण, तर 17 जागा अनुसूचित जातींसाठी आहेत. हरियाणात एकूण 2.01 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 1.06 कोटी पुरुष, 95 लाख महिला, 4.52 लाख नवीन मतदार आणि 40.95 लाख युवा मतदार आहेत.
हरयाणा विधानसभेच्या मतदानासाठी 20,629 मतदान केंद्रे तयार केली आहेत. 90 जागांसाठी एकूण 1031 उमेदवार रिंगणात असून, त्यात 101 महिलांचा समावेश आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी (लाडवा), भूपेंद्र सिंह हुड्डा (गढ़ी सांपला-किलोई), अभय सिंह चौटाला (एलनाबाद), दुष्यंत चौटाला (उचाना), अनिल विज (अंबाला कैट), ओपी धनखड़ (बादला), अनुराग ढंढा (कलायात) आणि विनेश फोगाट (जुलाना) यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. 2019 मध्ये भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 31 जागांवर विजय मिळवला होता.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी सलग तीन दिवस ‘संकल्प यात्रे’तून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचा भर नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि योगी आदित्यनाथ आदी प्रमुख नेत्यांच्या जनसभांवर राहिला. यावेळी सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल.
शेतकरी आंदोलन, महिला कुस्तीपटू आंदोलन, अग्निवीर योजना, बेरोजगारी, संविधान बचाओ हे काँग्रेसच्या प्रचारातील मुद्दे होते.
अग्निविरांना नोकऱ्यांची हमी, छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण आणि काँग्रेस दलितविरोधी हे भाजपचे प्रचारातील मुद्दे होते.
यंदाच्या निवडणुकीत हरियाणात प्रमुख जाट समूह काँग्रेसच्या बाजूने एकवटल्याचे दिसत असून, मुस्लीम व दलित मतांच्या पाठिंब्यावर भाजपचा पराभव करण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसने 26 जाट, 20 ओबीसी, 17 दलित, 11 पंजाबी हिंदू तसेच शीख, 6 ब्राह्मण, 5 मुस्लीम, 2 बनिया व राजपूत, बिश्नोई व रोर समाजातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे. भाजपने 21 ओबीसी, 17 जाट, 11 ब्राह्मण, 11 पंजाबी हिंदू, 5 बनिया व 2 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. हरियाणामध्ये जाट सुमारे 30 टक्के, दलित 20 टक्के, मुस्लीम 7 टक्के तर ओबीसी सुमारे 40 टक्के आहेत. ती कोणाच्या पारड्यात पडतात हे 8 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.