हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे (आयएनएलडी) चे प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचे काल निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गुरुग्राम येथील त्यांच्या घरी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर 11.30 वाजता त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात आणण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौटाला हे पाच वेळा हरयाणाचे मुख्यमंत्री होते.
ओम प्रकाश चौटाला हे हृदयविकार आणि मधुमेहासह अनेक आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता आणि आरएमएल रुग्णालयात आधीच उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सिरसा येथील चौटाला येथे आणले जाईल. शनिवारी सकाळी 8 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 3 वाजता सिरसा येथील तेजा खेडा फार्म स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, 2013 मध्ये, जेव्हा चौटाला शिक्षक भरती घोटाळ्यात तिहार तुरुंगात बंद होते, तेव्हा त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी पहिल्यांदा दहावी आणि नंतर बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.