हरमलातील 152 बेकायदा बांधकामांना नोटिसा जारी

0
11

गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा (जीसीझेडएमए) ने गिरकरवाडा-हरमल येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रातील (एनडीझेड) 152 बांधकामांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल देण्यात आली.
गिरकरवाडा-हरमल येथील बेकायदा बांधकाम प्रकरणी याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली. हरमलचे माजी सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांच्या बेकायदा बांधकामांच्या विषयावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

गिरकरवाडा येथील एनडीझेड विभागात उभारलेल्या बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. गिरकरवाडा येथे सुमारे 217 बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईचा निर्देश जीसीझेडएमएला दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकाराची स्वेच्छा दखल घेतली आहे.
हरमलचे माजी सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांची बरीच बेकायदेशीर बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. फर्नांडिस यांनी यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र काल सादर केले असून, या विषयावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

गिरकरवाडा येथील एनडीझेडमधील एक तीन मजली बेकायदा इमारत 90 दिवसांत जमीनदोस्त करण्याचे प्रतिज्ञापत्र इमारतीच्या मालकाने न्यायालयात दिले होते. या काळात इमारत जमीनदोस्त करण्याचे काम पूर्ण न झाल्याने संबंधित मालकाने मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे. ती इमारत पाडण्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.