हमीपत्रानंतरच पर्यटकांना रेंट अ कार, बाईक मिळणार

0
14

वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नवी नियमावली

राज्यात रेंट अ कार आणि रेंट अ बाईक चालकांच्या बेशिस्तपणे वाहने हाकण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी आता पोलीस यंत्रणेने नवा नियम तयार केला आहे. त्यानुसार रेंट अ कार आणि रेंट अ बाईक भाडेपट्टीवर घेणाऱ्या व्यक्ती किंवा पर्यटकाची वाहतूक नियम आणि दंडाची माहिती असलेल्या हमीपत्रावर स्वाक्षरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी आल्तिनो पणजी येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पणजीतील मांडवी नदीवर गेल्या महिन्यात झालेल्या एका अपघातात रेंट अ कारच्या धडकेने दुचाकीचालक थेट उसळून नदीत कोसळला होता. या घटनेत सदर दुचाकीचालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेंट अ कार व रेंट अ बाईकचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गोव्यात फिरण्यासाठी या वाहनांचे वापर करणारे पर्यटक नियमांचे उल्लंघन व बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने अनेक जीवघेणे अपघात घडू लागले आहेत.

राज्यातील रेंट अ कार आणि रेंट अ बाईक भाडेपट्टीवर देणाऱ्या एंजटांना हमीपत्र घेऊनच वाहन भाडेपट्टीवर पर्यटकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. या हमीपत्रामध्ये दहा मुद्द्यांवर भर देण्यात आला असून, हमीपत्रात नमूद केलेल्या मुद्यांचे पालन करण्याची सूचना केली जाणार आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही गुप्ता यांनी
स्पष्ट केले.

रेंट अ कार, रेंट अ बाईक भाडेपट्टीवर घेणाऱ्या पर्यटकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. एजंटांना वाहन भाडेपट्टीवर घेणाऱ्या पर्यटकाला वाहतूक नियम, रस्ते आणि दंडाबाबत माहिती देण्याची सूचना केली आहे. पर्यटकांना रस्त्याची योग्य माहिती नसल्याने बेशिस्तपणे वाहने हाकली जातात. वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी ही उपाययोजना करावी लागत आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.