>> संशयित कारचालकास अटक, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
हणजूण येथे झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात हणजूण येथील मायोर रोमा रिसोर्टच्या मालक रेमेडिया आल्बकुर्क (57) यांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात रिसोर्टचे कर्मचारी शिव मंगल दिंडो (22) आणि रूपा पारस (31) हे जखमी झाले आहेत. हरियाणा येथे नोंदणी झालेली ही आलिशान चारचाकी कार (एचआर 13 जी 1831) या क्रमांकाने नोंदणीकृत आहे. पुणे येथील एक पर्यटक सचिन कुरुप (42) हा दारूच्या नशेत सदर कार चालवत असल्याचा संशय आहे. या अपघातात मृत्युमुखी पडेल्या रेमेडिया ह्या हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरकडे फोनवर बोलत होत्या. त्यावेळी पर्यटक सचिन हा सदर हॉटेलमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी येत असताना दारुच्या नशेत त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट येऊन हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरवर जोरात धडकली. त्यामुळे तेथे असलेली हॉटेलच्या मालक रेमेडिया आल्बकुर्क या अपघातात ठार झाल्या. सदर घटना इतक्या जलद झाली रेमाडिया यांना प्रसंगावधान राखण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात इतर दोन कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी कारचालक सचिन कुरुप याला अटक केली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी हणजूण पोलीस स्थानकात धाव घेऊन आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. आरोपीची दारू आणि अमली पदार्थ सेवन केल्याबद्दल वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दिवाळीच्या पूर्वरात्री म्हणजेच शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान वागातोर येथे हा अपघात झाला.
ग्रामस्थांचा पोलीस स्थानकाला घेराव
या अपघाताचा हणजूण पोलिसांनी पंचनामा केला असला तरी या पंचनाम्याविषयी ग्रामस्थांनी संशय व्यक्त करत काल रविवारी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामस्थांनी हणजूण पोलीस स्थानकाला घेराव घातला. ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याविषयी काही प्रश्न असून त्या प्रश्नांची उत्तरे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत असे सांगितले. ग्रामस्थांनी ज्या हरियाणा पासिंग गाडीचा अपघात झाला त्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे. तसेच कार चालकासोबत एक रशियन महिला असल्याचा संशय व्यक्त करत ती कुठे आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला.