>> परराज्यांतील दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक; एका तरुणीचा समावेश
हणजूण पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी मोठी कारवाई करत परराज्यांतील दोघा ड्रग्ज पेडलर्सना अटक केली असून, त्यांच्याकडून १०.२० लाखांचा एमडीएमए हा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हणजूणमध्ये अमलीपदार्थांचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम संशयित खाली कुर्बान सलार शेख (वय २५, बोरीवली, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडे ३ लाख २०
हजार रुपयांचा ३२१ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज सापडला. तो ड्रग्ज विक्री व्यवहारातील पेडलर आहे.
शेख याची कसून चौकशी केली असता एक २९ वर्षीय तरुणी दिल्लीतून अमलीपदार्थ घेऊन निघाली आहे, असे पोलिसांना समजले. ही तरुणी शेखला ड्रग्ज पुरवणार होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला व संशयित तरुणीला ताब्यात घेऊन अटक केली. तिच्याकडे ७ लाखांचा ६८.९ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज सापडला.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १०१ ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १० लाख २० हजार रुपये इतकी आहे. दोन्ही संशयितांना येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
ही कारवाई उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल फळदेसाई, उपनिरीक्षक धीरज देविदास, अक्षय पार्सेकर, स्नेहा सावळ, कॉन्स्टेबल गोलतेकर, महेंद्र मांद्रेकर, किशन बुगडे व रुपेश आजगावकर या पथकाने केली.